पुणे मनपातील २३ गाव कर्मचाऱ्यांवरील वेतन व हुद्दा बदलाचा मुद्दा तीव्र ; आयुक्तांकडे तातडीची मागणी, पुनर्चौकशीचे आश्वासन…

पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात आणि आस्थापना बदलामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुल रामचंद्र शेवाळे यांनी आज मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. सन २०२१ मध्ये २३ गावांचा मनपामध्ये समावेश झाल्यानंतर मनपाने कर्मचाऱ्यांच्या हुद्द्यांची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. मात्र या समितीने तयार केलेल्या अहवालात अनेक कर्मचाऱ्यांचे पदमान कमी करण्यात आले असून पगारात मोठी कपात झाल्याचा आरोप शेवाळे यांनी आयुक्तांसमोर मांडला.
वेतन कपातीमुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून मुलींच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, घरबांधणी आणि हॉस्पिटल खर्चासाठी घेतलेली लाखो रुपयांची कर्जे फेडणे कठीण झाले आहे. बँक हप्ते थकण्याची वेळ आल्याने कर्मचारी मानसिक तणावात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सतत तक्रारी होत असून अनेक गावातील कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला अन्यायकारक आणि सूडबुद्धीचा परिणाम म्हटले आहे. उपजीविकेचा प्रश्न उभा राहिल्याने कर्मचारी वर्ग धास्तावला असल्याचेही शेवाळे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर शेवाळे यांनी आयुक्तांकडे वेतन कपात तात्काळ स्थगित करावी, आस्थापना बदल रद्द करून हुद्दे पूर्ववत करावेत आणि संबंधित समितीची निष्पक्ष पुनर्चौकशी करावी, अशी ठोस मागणी केली. यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी अहवालाचे पुनर्मूल्यांकन करून कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच आवश्यक त्या निर्देशांची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस मनपा उपायुक्त प्रसाद काटकर तसेच २३ गावांतील अनेक कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या वाढत्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat





