अपील निकालाचा धक्का; बारामती आणि फुरसुंगी–उरुळी देवाची निवडणुका रद्द, नवा मतदान दिवस २० डिसेंबर

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की ज्या जागांसाठी अपील दाखल होते आणि त्या अपीलांवरील जिल्हा न्यायालयाचा निकाल २२ नोव्हेंबर २०२५ नंतर म्हणजे २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर दिला गेला असल्यास त्या जागांची निवडणूक पूर्वनिश्चित ४ नोव्हेंबर २०२५ च्या कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नये. तसेच अशा प्रकरणात अध्यक्षपदाचा समावेश असल्यास संबंधित संपूर्ण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक स्थगित करण्यात यावी आणि नव्या वेळापत्रकानुसारच निवडणूक कार्यक्रम राबवावा, असे निर्देश आयोगाने सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती व फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर जिल्हा न्यायालयातील प्रलंबित अपीलांचा थेट परिणाम झाला आहे. दोन्ही नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासंदर्भातील अपीलांवर आवश्यक तेवढा निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत लागणे अपेक्षित असतानाही न्यायालयाने हा निकाल २६ नोव्हेंबर रोजी पारित केल्याचे समोर आले आहे. आयोगाच्या निकषानुसार अध्यक्षपदावरील अपीलाचा निकाल विलंबित झाल्यास संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलणे बंधनकारक आहे. त्यामुळे बारामती व फुरसुंगी–उरुळी देवाची या दोन्ही नगरपरिषदांच्या ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आल्या आहेत.
याचबरोबर बारामती नगरपरिषदेतील जागा क्र. २(अ), ८(ब), ११(ब), १३(ब), १५(ब), १७(अ) आणि १९(ब) तसेच फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेतील जागा क्र. १३(ब) या सदस्यपदांच्या जागांवरही न्यायालयीन निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागल्याने या जागांवरील मतदान देखील नव्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार बारामती व फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदांच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्यपदांसाठीची सार्वत्रिक निवडणूक आता २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड आणि सासवड नगरपरिषदेतील काही सदस्यपदांवरील अपीलांचे निकालदेखील २२ नोव्हेंबरनंतरच प्राप्त झाल्याने त्या जागांच्या निवडणूक वेळापत्रकातही आवश्यक बदल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या जागा क्र. २(अ), ७(अ), ७(ब), ८(अ), ८(ब), १०(ब), लोणावळा नगरपरिषदेच्या जागा क्र. ५(ब) व १०(अ), दौंड नगरपरिषदेच्या जागा क्र. ९(अ) आणि सासवड नगरपरिषदेच्या जागा क्र. ११(अ) या जागांसाठीचे मतदान देखील २० डिसेंबर २०२५ रोजीच होणार आहे.
सदर सुधारित वेळापत्रकानुसार आता कोणत्याही उमेदवारास नवीन नामनिर्देशन दाखल करण्याची परवानगी राहणार नाही. मात्र पूर्वी दाखल केलेले नामनिर्देशन मागे घ्यावयाचे असल्यास त्यासाठीची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम संबंधित क्षेत्रात स्वतंत्र जाहिरातीद्वारे प्रसारित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी कळविले असून सर्व नागरिकांनी या बदलाची योग्य नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Editer sunil thorat



