मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलश पूजन…

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आळंदीतील समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहणाचा ऐतिहासिक सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वकल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक ठरणारा आहे.” वारकरी संप्रदायाने प्राचीन मूल्ये जपत समाजात ऐक्य निर्माण केले. २१ व्या वर्षी माऊलींनी दिलेला विचार शतकानुशतके आपल्याला मार्गदर्शन करतो, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, भगवद्गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संतज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहणाचा योग श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभदिनी साध्य झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. २२ किलो वजनाचा हा सुवर्ण कलश भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आला. यावेळी श्री ज्ञानेश्वरी (सार्थ) ऑडिओ बुकचेही प्रकाशन करण्यात आले, ज्यामुळे ज्ञानेश्वरीचा संदेश जगभर पोहोचेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी परंपरेच्या महान परंपरेवर प्रकाश टाकला. “वारकऱ्यांसाठी ज्ञानोबा हा श्वास आणि आळंदी ही काशी आहे. ज्ञानेश्वरीतील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑडिओ क्लिप तयार करून प्रसार करावा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आळंदी विकास आराखड्यासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सोहळ्यात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे संकेतस्थळ प्रकाशित करण्यात आले. समाधी मंदिरात सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण कलश व महाद्वारासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास न्यायाधीश महेंद्र महाजन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, बाबाजी काळे, तसेच संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat





