USPA कंपनीचे नाव व लोगो बापरुन कॉपीराईट केलेले ८१७ बनावट शर्ट, दोघांवर गुन्हा, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; कदमवाकवस्ती..

पुणे (हवेली) : युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशन या कंपनीच्या नावाने लोणी स्टेशन कदमवाकवस्ती परिसरातील ए टू झेज व रॉयल फिल लाईफस्टाईल या कापड दुकानातून बनावट कपड्यांची विक्री होत असल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही दुकानचालकांवर गुन्हा दाखल करून सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अविश मौला सय्यद (वय- २८ रा. उरुळी कांचन, तळवडी, हरिजिवन हॉस्पीटल जवळ, आबा कांचन चाळ, ता. हवेली, जि. पुणे) व स्वरुपसिंग अशोकसिंग राजपुरोहित (वय-२७, रा. जिल्हा परिषद शाळा, कदमवाकवस्ती, सिता कॉम्पलेक्स, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी मंगेश जगन्नाथ देशमुख (वय ४५, रा. घर नंबर ९. गल्ली नंबर ३. ओमकार कॉलनी, वारजे, पुणे ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश देशमुख हे युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशनमध्ये काम करीत आहेत. पोलो कंपनीच्या नावाने मार्केटमध्ये जर कोण बनावट मालाची विक्री करीत असेल तर त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम देशमुख करत आहेत. देखमुख यांना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरातील ए टू झेज व रॉयल फिल लाईफस्टाईल या दुकानातून बनावट पोलो कंपनीच्या कपड्यांची विक्री होत आहे. अशी एकाने त्यांच्याकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने फिर्यादी देशमुख यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता, वरील दोन्ही दुकानांमधून युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशन या कंपनीच्या नावाने कपड्यांची विक्री होत असल्याचे उघड झाले. त्यांच्या कापड दुकानातून ४ लाख ८ हजार ५०० रुपये किंमतीचे यु. एस. पी. ए. (USPA) कंपनीचे नाव व लोगो बापरुन कॉपीराईट केलेले ८१७ बनावट शर्ट आढळून आले.
याप्रकरणी मंगेश देशमुख यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविश सय्यद व स्वरुपसिंग राजपुरोहित यांच्यावर कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51, 63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.



