दिल्ली : भारतात दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेवर उपचार म मिळाल्यानं हजारो लोकांचा मृत्यू होतो. नागरिकांचे अशा प्रकारचे मृत्यू आणि असे अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने पावलं उचलत आहे.
सोमवारी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणाऱ्या लोकांसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केलीय. सरकार ही रक्कम वाढवून २५ हजार रुपये अशी केलीय. सध्या सरकार पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना ही घोषणा केली. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत एका मुलाखतीवेळी नितीन गडकरी यांनी मंत्रालयाला बक्षीसाची रक्कम वाढवण्याचे आदेश दिले. गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात वेळेवर दाखल करणं गरजेचं असतं. अपघातातील जखमी लोकांना गोल्डन आवर म्हणजेच एका तासाच्या आता रुग्णालयात नेलं गेलं तर त्यांच्या वाचण्याची शक्यता जास्त वाढते.
केंद्र सरकारकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये एक योजना सुरू करण्यात आली होती. रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी या उद्देशाने योजना सुरू केलेली. सध्या या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तींना बक्षीसाच्या रकमेसह प्रमाणपत्र दिलं जातं.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातात लोकांचा जीव वाचवणाऱ्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंटची घोषणा केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, रस्त्यावर जर एखाद्याचा अपघात झाला तर त्या व्यक्तीवर कॅशलेस उपचार केले जातील. याचाच अर्थ सरकार त्या व्यक्तीच्या उपचाराचा खर्च करेल. हा उपचार ७ दिवसांपर्यंत असेल आणि यात जास्ती जास्त दीड लाख रुपयांपर्यंत सरकार खर्च करेल. मार्च महिन्यात ही योजना सुरू केली जाईल.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा