जालना जिल्ह्याला नवी प्रशासकीय जबाबदारीची साथ! आशिमा मित्तल यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला…

जालना : श्रीमती आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा शुक्रवार, दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्या यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या आणि शिक्षण व प्रशासन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी असलेल्या आशिमा मित्तल या आयआयटी मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त असून, त्यांना प्रतिष्ठित शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक देखील मिळाले आहे. त्यांनी मानववंशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सन 2017 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा (IAS) उत्तीर्ण करत त्यांनी देशात १२वा क्रमांक मिळवला होता. 2018 साली त्या महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्त झाल्या. त्यांच्या प्रशासनिक प्रवासात त्यांनी डहाणू (पालघर) येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी, तसेच अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवकल्पना राबवून सकारात्मक बदल घडवून आणले. आता जालना जिल्हाधिकारी म्हणून त्या प्रशासनाच्या विविध अंगांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
नवीन जिल्हाधिकारीच्या आगमनामुळे जालना जिल्ह्यातील प्रशासनाला नवी ऊर्जा आणि दृष्टीकोन मिळणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Editer Sunil thorat




