
शंकर जोग
पुणे : पुणे येथील राष्ट्रसेवा दलामध्ये संस्था विरोधी विचारसरणीच्या व्यक्तींनी सभासद असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे सादर करत संस्थेची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून राष्ट्रसेवा दलाच्या मूळ धोरण व संहितेत बेकायदेशीर बदल करून सेवेदलात घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रसेवा दलाचे सभासद श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन पुण्यातील वाडिया कॉलेजसमोरील धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर शांततामय पद्धतीने पार पडले. यावेळी सहधर्मादाय आयुक्त डॉ. राजेश परदेशी यांना या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. संस्थेच्या मूळ मूल्यांना आणि विचारधारेला धक्का पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या सत्याग्रह आंदोलनास प्रशांत दाडेकर, आर. बी. माने, संजय वाघमारे, दलित सेना पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार, दलित सेना पुणे शहर महिला अध्यक्षा शबनम खान यांच्यासह राष्ट्रसेवा दल व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेची परंपरा, मूल्ये व शिस्त अबाधित ठेवण्यासाठी अशा घुसखोरीच्या प्रयत्नांना विरोध करणे आवश्यक असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले.
Editer sunil thorat



