
शेवाळवाडी (हडपसर) : शेवाळवाडी परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, शेवाळवाडी येथे नवीन पोलीस चौकी सुरू करण्यास शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळवण्यासाठी राजे क्लबकडून फेब्रुवारी २०२४ पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात राजे क्लबने पोलीस आयुक्त कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदने सादर करत सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच पोलीस चौकीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएल प्रशासनाशी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली. या समन्वयात्मक प्रयत्नांमुळे शेवाळवाडी पोलीस चौकीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचून त्याला मंजुरी मिळाली.
या संपूर्ण प्रक्रियेत पुरंदर-हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे तसेच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे राजे क्लबकडून नमूद करण्यात आले आहे.
नवीन पोलीस चौकीच्या मंजुरीची अधिकृत घोषणा तसेच उद्घाटन समारंभ आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.
या नवीन पोलीस चौकीमुळे शेवाळवाडी व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसेल, तसेच नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखली जाईल, असा विश्वास राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष व मा. उपसरपंच अमित अण्णा पवार यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पोलीस चौकी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, राजे क्लबच्या या यशस्वी उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
Editer sunil thorat



