लोहार समाजाचा गौरव : कुमारी प्रज्ञा संजय पवार यांचे CA परीक्षेत घवघवीत यश…

पुणे : नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत पुण्यातील कुमारी प्रज्ञा संजय पवार यांनी उल्लेखनीय यश संपादन करून कुटुंबासह संपूर्ण लोहार समाजाचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल लोहार समाजाच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
सातारा महासंघाचे उपाध्यक्ष किसनराव बलांसे (पुणे), लोहार समाज धर्मशाळेचे उपाध्यक्ष बाळासाहेब सदाशिव थोरात तसेच धर्मशाळेचे अध्यक्ष दिलीप अनंता थोरात यांनी कुमारी प्रज्ञा संजय पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देत त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
या सत्कारप्रसंगी कु. प्रज्ञा यांचे मामा ज्ञानेश्वर (माऊली) थोरात, पुणे तसेच दिगंबर थोरात, पुणे यांची उपस्थिती होती. कुमारी प्रज्ञा यांचे वडील एका खाजगी कंपनीत कार्यरत असून आई गृहिणी आहेत. त्यांना एक बहीण व एक भाऊ असून संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या शिक्षणासाठी मोलाची साथ दिली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
चार्टर्ड अकाउंटंटसारखी अत्यंत कठीण व स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होणे ही मोठी बाब असून लोहार समाजामध्ये CA पदवीधरांची संख्या आजही अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत कुमारी प्रज्ञा संजय पवार यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवून समाजातील तरुण-तरुणींसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधता येते, याचे हे जिवंत उदाहरण असून कुमारी प्रज्ञा यांचे यश येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Editer sunil thorat



