इंजि. पांडुरंग शेलार यांना ‘इन्सपायरिंग इंडियन’ पुरस्काराने सन्मान…

पुणे : समाजहितासाठी उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘इन्सपायरिंग इंडियन’ पुरस्कार यंदा खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता इंजि. पांडुरंग शेलार यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू प्लाझा हॉटेल येथे झालेल्या भव्य समारंभात पद्मभूषण व जागतिक दर्जाच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गोल्डन स्पॅरोज या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन प्रदान केला जातो. पाटबंधारे क्षेत्रात दीर्घकाळ सेवा बजावताना जलसंधारण, सिंचन व्यवस्थापन, ग्रामीण भागातील पाणीप्रश्नांवर उपाययोजना आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचा ठसा उमटवणाऱ्या इंजि. शेलार यांच्या कार्याची यावेळी विशेष प्रशंसा करण्यात आली.
या समारंभाला पद्मश्री सतेंद्रसिंग लोहिया, पद्मश्री डॉ. बक्षी राम, डॉ. तन्वर टिळक, आरती मल्होत्रा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना इंजि. शेलार यांनी हा सन्मान जनतेच्या विश्वासाचा असून, भविष्यातही समाजोपयोगी कार्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.
इंजि. पांडुरंग शेलार यांच्या या सन्मानामुळे पाटबंधारे क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला असून, त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
Editer sunil throat



