दुबार मतदान कसे टाळणार? राज्य निवडणूक आयोगाचा सविस्तर आराखडा जाहीर…

मुंबई : मुंबई-ठाण्यासह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. ३१ जानेवारीच्या अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, दुबार मतदानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
या पार्श्वभूमीवर दुबार मतदार टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकांसाठी वापरण्यात येणारी मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त करण्यात आलेली आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. ही यादी प्रभागनिहाय विभागलेली असून, त्यामधील नाव वगळणे किंवा नवीन नाव समाविष्ट करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाहीत.
मात्र, प्रभाग पुनर्रचनेमुळे किंवा पत्त्यातील बदलामुळे एखादा मतदार चुकून दुसऱ्या प्रभागात गेलेला असल्यास, अशा तांत्रिक चुका दुरुस्त करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष चिन्हांकन…
मतदार यादीत संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टार (**) चिन्ह लावण्यात आले आहेत. या चिन्हांकित मतदारांची माहिती घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणा दरम्यान संबंधित मतदार नेमके कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याची नोंद घेण्यात आली आहे. त्यानुसार त्या मतदाराला फक्त एकाच निश्चित मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे दुबार मतदानास पूर्णतः आळा घालण्यात येईल, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.
मुंबईतील मतदार यादीत घोळ – आयोगाची कबुली…
महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईतील मतदार यादीत काही प्रमाणात घोळ असल्याचे मान्य केले. मात्र, या त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाने वेळेत उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे नियोजन…
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी केलेले नियोजन पुढीलप्रमाणे आहे —
एकूण मतदान केंद्रे: १०,१११
कंट्रोल युनिट्स: ११,३४९
बॅलेट युनिट्स: २२,६९८
मतदार यादीची अर्हता तारीख: १ जुलै २०२५
या व्यापक तयारीमुळे मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि विश्वासार्ह होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.
दुबार मतदार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी…
दुबार मतदानासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान, सर्वेक्षण आणि प्रशासकीय यंत्रणेचा समन्वय साधण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Editer sunil thorat



