मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेवाळेवाडीला ३७ कोटींच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन…
भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे व माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश...

शेवाळेवाडी (हडपसर) : शेवाळेवाडी गावाच्या पाणीटंचाईच्या दीर्घकालीन समस्येवर अखेर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना मार्गी लागली आहे. पुणे महानगरपालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेवाळेवाडी गावासाठी सुमारे ३७ कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, या महत्त्वाकांक्षी योजनेचे ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच प्रतिमा शेवाळे व माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री यांचा सत्कार केला.
आज पुणे महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याच कार्यक्रमात शेवाळेवाडी गावासाठीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, बी.पी. पृथ्वीराज, आमदार चेतन तुपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शेवाळेवाडी गावाला अद्यापही बंद नळाने नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाढती लोकसंख्या, नव्याने झालेली वसाहत आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे गावातील पाणीप्रश्न अधिक गंभीर झाला होता.
या पार्श्वभूमीवर भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा शेवाळेवाडी गावचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेवाळेवाडी गावच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने हालचाली सुरू करत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक, गावात प्रत्यक्ष पाहणी आणि तांत्रिक अभ्यास करून सविस्तर डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केला. या डीपीआरनुसार शेवाळेवाडी गावासाठी स्वतंत्र जलस्रोत, जलवाहिनी, जलसंचय व्यवस्था आणि वितरण प्रणाली उभारण्यात येणार असून, त्यामुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत बंद नळाद्वारे शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
या योजनेमुळे शेवाळेवाडीतील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊनही पाणीपुरवठा सुरळीत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पाठपुराव्याला यश ; ग्रामस्थांत समाधान…
राहुल शेवाळे, माजी उपसरपंच,
शेवाळेवाडी ग्रामपंचायत
“शेवाळेवाडी गावच्या पाणीप्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देत अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने बैठक घेतली, गावात पाहणी केली आणि योग्य डीपीआर तयार केला. अखेर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या योजनेचे भूमिपूजन झाले. हे आमच्यासाठी आणि सर्व ग्रामस्थांसाठी मोठे समाधान व अभिमानाची बाब आहे.”
Editer sunil thorat



