
लोणीकंद (ता. हवेली) : “किरण, तू काळजी करू नकोस. तुझी राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तू सामान्य कुटुंबातून आलेला असूनही तुझ्याकडे मोठं कर्तृत्व आहे. जनतेच्या सेवेचा तुझ्याकडे खरा हेतू आहे.” अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी पै. किरण संपत साकोरे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रदीप कंद म्हणाले, “राजकारणात गावाचा आकार नसतो, कर्तृत्व पाहिलं जातं. किरण यांनी आपल्या कामातून हे सिद्ध केलं आहे. विकासाचे राजकारण हेच पै. किरण साकोरे यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे.”
काशी-अयोध्या यात्रेचा संवाद मेळावा भव्य जल्लोषात संपन्न…
लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी आयोजित काशी विश्वनाथ व अयोध्या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने २ नोव्हेंबर २०२५ रोजी पेरणे येथील गोल्डन पॅलेस येथे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात लोणीकंद-पेरणे परिसरातील नागरिकांनी पै. किरण साकोरे यांना प्रचंड प्रतिसाद आणि भरघोस आशीर्वाद दिला.
या कार्यक्रमात विकास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. यात्रेचे नियोजन अत्यंत उत्कृष्टपणे करण्यात आले असून भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रदीप विद्याधर कंद यांनी सांगितले.
समाजसेवेचा वारसा आणि विकासाचे ध्येय…
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पै. किरण साकोरे यांनी स्वकष्टाने व्यवसाय उभारून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. समाजसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी बैलगाडा घाट, धर्मशाळा, रस्ते, मंदिरे आणि वारकरी सेवा यांद्वारे समाजासाठी सातत्याने काम केलं आहे.
काशी-अयोध्या यात्रेतून त्यांनी अध्यात्म आणि विकासाचा यशस्वी संगम साधला असून, ही यात्रा जनतेच्या आध्यात्मिक उन्नतीसह सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरली आहे.
“विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या दारात पोहोचवणार” — पै. किरण साकोरे…
मेळाव्यात बोलताना पै. किरण संपत साकोरे म्हणाले, “मायबाप जनता जनार्दन व काशी विश्वनाथ आणि अयोध्येचे प्रभू श्रीराम यांच्या आशीर्वादाने आम्हाला या यात्रेतून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुणांच्या सहकार्याने लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू.”
मेळाव्यात मान्यवरांची उपस्थिती आणि जनतेचा प्रतिसाद…
या संवाद मेळाव्यात शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भाजप क्रीडा आघाडी प्रदेशाध्यक्ष पै. संदीप भोंडवे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, हवेली पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व संचालक रविंद्र कंद, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर, हवेली पं.स.च्या उपसभापती संजीवनी कापरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील विविध गावांतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संस्थांचे पदाधिकारी, महिला माता भगिनी, युवक व तरुण वर्ग यांच्या उपस्थितीने हा मेळावा उत्साहात पार पडला.
Editer sunil thorat







