नवीन विहीर, दुरुस्ती, बोअर खोदणे आणि शेततळ्यासाठी मिळणार थेट अनुदान! — जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पुणे : शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी राज्य शासनाकडून ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ राबविली जाते. या योजनांमधून शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, बोअर खोदणे, शेततळे, सौर पंप, पाइपलाइन, सूक्ष्म सिंचन, परसबाग यांसाठी थेट अनुदान दिले जाते.
ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कृषी विभागामार्फत राबविली जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानाचा लाभ मिळू शकतो.
घटकनिहाय अनुदान दर…
घटक मिळणारे अनुदान
नवीन विहीर बांधकाम ₹४,००,०००
जुनी विहीर दुरुस्ती ₹१,००,०००
शेततळे (प्लास्टिक अस्तरीकरण) ₹२,००,०००
सूक्ष्म सिंचन संच ₹९०,०००
सौर पंप ₹५०,०००
परसबाग / इनवेल बोअरिंग / पंप संच ₹८०,०००
बोअर खोदणे (नवीन घटक) ₹५०,०००
विशेष म्हणजे, “बोअर खोदण्यासाठीचे अनुदान” हा घटक यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनानं तो लागू केला आहे.
पात्रता निकष…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना – अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – अर्जदार अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा.
अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर शेती असावी.
आवश्यक कागदपत्रे : जात प्रमाणपत्र, ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती.
अर्ज प्रक्रिया
शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉https://mahadbt.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर जावे.
ऑनलाइन अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ऑफलाइन माहिती किंवा सहाय्यासाठी गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधावा.
महत्त्वाची सूचना…
दोन्ही योजनांत प्रत्येक कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला लाभ मिळतो.
पात्रतेच्या अटी पूर्ण केल्याशिवाय अनुदान मंजूर होत नाही.
अर्ज सादर करताना कोणतेही फेक वेबसाईट्स किंवा दलाल यांच्याकडे जाणे टाळा.
अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
“शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश”
या दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश — शेतीतील पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या मदतीचा योग्य लाभ घेतला, तर शेतकऱ्यांना शेतीतील सिंचन आणि पिक उत्पादनात मोठी मदत होणार आहे.
Editer sunil thorat



