देश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

भारत महिला वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला तब्बल ४० कोटींचं बक्षीस, दक्षिण आफ्रिकेलाही कोट्यवधींची रक्कम

नवी मुंबई : महिला क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला संघाने विश्वविजेतेपद मिळवत नवा इतिहास घडवला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी मैदानावर खेळवण्यात आलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयासह केवळ क्रिकेटच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही भारतीय संघाने मोठी झेप घेतली आहे.

भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव…

वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या भारतीय महिला संघाला आयसीसीकडून तब्बल ४.४८ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ४० कोटी रुपये) इतकी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
ही रक्कम २०२२ मध्ये विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या १.३२ दशलक्ष डॉलर्सपेक्षा २३९ टक्क्यांनी जास्त आहे.

भारतीय संघाने प्रथमच एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून जगभरातील महिला क्रिकेट चाहत्यांना अभिमानाची पर्वणी दिली. या विजयामुळे भारतीय संघाला प्रतिष्ठा, गौरव आणि भरघोस आर्थिक बळ लाभले आहे.

दक्षिण आफ्रिकेलाही मोठं बक्षीस…

उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही २.२४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २० कोटी रुपये) बक्षीस मिळणार आहे. ही रक्कम २०२२ मध्ये उपविजेता इंग्लंडला मिळालेल्या ६००,००० डॉलर्सपेक्षा २७३ टक्क्यांनी अधिक आहे. लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने उत्कृष्ट लढा दिला, पण भारताच्या भक्कम खेळासमोर अखेर नांगी टाकावी लागली.

उपांत्य फेरीतील संघांनाही कोट्यवधींचं बक्षीस…

या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांना प्रत्येकी १.१२ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ९.३ कोटी रुपये) मिळाले आहेत. २०२२ च्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांना फक्त ३००,००० डॉलर्स मिळाले होते, त्यामुळे या वेळी आयसीसीने केलेल्या वाढीने महिला क्रिकेटच्या बक्षीस संरचनेत ऐतिहासिक उडी घेतली आहे.

इतर संघांनाही मिळाले भरघोस पैसे…

पॉइंट टेबलमध्ये पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड संघांना प्रत्येकी ७ लाख डॉलर्स (सुमारे ५.८ कोटी रुपये) देण्यात आले आहेत. तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान संघांना प्रत्येकी २.८ लाख डॉलर्स (अंदाजे ₹२.३ कोटी) रक्कम देण्यात आली आहे.

याशिवाय, या विश्वचषकात सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला आयसीसीकडून २.५ लाख डॉलर्स (सुमारे ₹२ कोटी) इतकी हमी रक्कम दिली गेली होती. तसेच प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला ३४,३१४ डॉलर्स (अंदाजे ₹२८ लाख) अशी अतिरिक्त प्रोत्साहन रक्कमही जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय विजयाचा गौरव…

भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करत २९९ धावांचा डोंगर उभा केला. त्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत २४६ धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने पहिल्यांदाच एकदिवसीय महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. या विक्रमी यशामुळे भारतीय संघाने केवळ विश्वचषकच जिंकला नाही, तर जगभरातील महिला क्रिकेटच्या दर्जात आणि प्रतिष्ठेतही नवा अध्याय लिहिला आहे. आयसीसीच्या या आर्थिक प्रोत्साहनामुळे महिला क्रिकेट क्षेत्रात आता आणखी स्पर्धात्मकता आणि व्यावसायिकतेचा नवा युगारंभ होणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??