‘एमआयटी एडीटी विद्यापीठाचा ८ वा दीक्षांत समारंभ शनिवारी मोठ्या दिमाखात पार पडणार’…
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या अग्रगण्य विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता स्वामी विवेकानंद मंडप, लोणी काळभोर येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या समारंभात राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाची अध्यक्षता विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड करणार असून, कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाने अत्यंत भव्य पद्धतीने केले आहे. यंदा एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विशेष पाहुण्यांची उपस्थिती…
या कार्यक्रमास भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेशचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच, भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन आणि उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष रामानन रामनाथन यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.)’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे सुभाष त्यागी, चेअरमन – गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीज, यांना औद्योगिक नेतृत्व क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ लेटर्स (D.Litt.)’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्यापीठाची प्रगती आणि उपलब्धी…
२०१५ साली स्थापन झालेल्या एमआयटी एडीटी विद्यापीठाने अल्पावधीतच शिक्षण, संशोधन, कला, डिझाईन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी साधली आहे. या वर्षीच्या दीक्षांत समारंभात २१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर १९५ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे ८ हजारांहून अधिक उपस्थिती अपेक्षित आहे. विद्यापीठ परिसरात तयारीला अंतिम टप्पा आला असून, संपूर्ण परिसर दिव्यांनी सजविण्यात आला आहे.
गौरवशाली परंपरेचा वारसा…
एमआयटी एडीटी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नेहमीच मान्यवरांच्या उपस्थितीने वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. आतापर्यंतच्या सात दीक्षांत समारंभांत माजी राज्यपाल व विद्यमान उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी, तसेच इस्त्रोचे विद्यमान चेअरमन डॉ. एस. सोमनाथ यांसारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांनी सहभाग नोंदविला आहे. या परंपरेला यंदाही यशस्वीपणे पुढे नेण्याचा संकल्प विद्यापीठाने केला आहे.
आयोजन समितीची माहिती…
या भव्य समारंभाच्या आयोजनासाठी कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टीम परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाची रूपरेषा आणि सुरक्षेची तयारी पूर्णत्वास आली असून, विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत.
“यंदा दीक्षांत समारंभात २१ पीएच.डी., २१ सुवर्णपदकांसह एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यपाल हरिभाऊ बागडे, प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा, रामानन रामनाथन आणि सुभाष त्यागी प्रथमच विद्यापीठात येत असल्याने, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे.”
— प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.
Editer sunil thorat



