राज्यात आचारसंहिता लागू ; अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा…
२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल; नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी कार्यक्रम जाहीर...

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तगडा राजकीय उत्साह आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, संबंधित क्षेत्रांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.
निवडणूक आयुक्तांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, या निवडणुका २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी होणार आहेत. या माध्यमातून एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार आहेत. यामध्ये दहा नवीन नगरपरिषद व पंधरा नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे टप्पा तारीख…
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५
छाननी १८ नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशन माघारी (अपील नसलेली) २१ नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशन माघारी (अपील असलेली) २५ नोव्हेंबर २०२५
चिन्ह वाटप व अंतिम यादी २६ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस २ डिसेंबर २०२५
मतमोजणीचा दिवस ३ डिसेंबर २०२५
निकाल राजपत्रात प्रसिद्ध १० डिसेंबर २०२५
आचारसंहिता लागू, मात्र आपत्ती मदतीला सूट…
घोषणेसह संबंधित नगरपरिषद व नगरपंचायती क्षेत्रांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. या काळात कोणतेही नवीन शासकीय कार्यक्रम, कामे, निधीवाटप, उद्घाटन किंवा घोषणा करता येणार नाहीत. तथापि, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, भूकंप किंवा आगीसारख्या आकस्मिक प्रसंगांमध्ये दिली जाणारी मदत आणि धार्मिक उपासना यांना आचारसंहितेतून सूट देण्यात आली आहे.
महिला उमेदवारांना मोठी संधी…
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी एकूण ६,८५९ सदस्यपदे निश्चित झाली आहेत, त्यापैकी ३,४९२ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. सामाजिक आरक्षणानुसार खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे –
अनुसूचित जाती (SC) : ८९५ जागा (४९८ महिला)
अनुसूचित जमाती (ST) : ३३८ जागा (१८७ महिला)
सर्वसाधारण व इतर मागासवर्ग (OBC) : प्रमाणानुसार आरक्षित
आयोगाच्या सूत्रांनुसार, या निवडणुकांमधून स्थानिक नेतृत्वात महिलांचा प्रभाव वाढण्याची अपेक्षा आहे.
आयोगाचे स्पष्टीकरण – “कुणाच्याही दबावाखाली नाही”
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, “आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच मिळते. दुबार मतदारांची पडताळणी सुरू आहे आणि चुका दुरुस्त केल्या जात आहेत.”
राजकीय चढाओढीला सुरुवात…
कार्यक्रम जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी तयारीचा बिगुल फुंकला आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची बैठक, प्रचार आराखडे आणि संभाव्य बंडखोरीच्या चर्चांना वेग आला आहे.
या निवडणुकांमधून अनेक ठिकाणी सत्तांतराची शक्यता असून, नागरिक नव्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहेत.
Editer sunil thorat



