
लोणी काळभोर : एंजल हायस्कूलच्या माजी प्राचार्या आणि शिक्षिका सौ. त्रिवेणी गोकुळ घाटे (वय ५९) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पूर्व हवेली परिसरातील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. त्रिवेणी घाटे यांनी सन २००१ ते २०२१ या कालावधीत तब्बल वीस वर्षे एंजल हायस्कूलच्या शिक्षिका व नंतर प्राचार्या म्हणून कार्यभार सांभाळला. शाळेच्या स्थापनेपासूनच्या जडणघडणीत आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे राहिले.
एंजल हायस्कूलचे संस्थापक कै. ओमप्रकाश शर्मा व इराणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शाळेची धुरा समर्थपणे वाहिली.
शिस्तप्रिय, कणखर आणि विद्यार्थ्यांची प्रेरणास्थान…
पूर्व हवेली परिसरातील पालक व विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांनी नेहमीच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद राखला.
त्यांचा कडक पण प्रेमळ स्वभाव, शिस्तप्रिय वृत्ती आणि संयमी नेतृत्वशैली यामुळे एंजल हायस्कूल परिसरात “त्रिवेणी मॅडम म्हणजे शिस्त आणि माया यांचं संगम” असा लौकिक निर्माण झाला होता.
अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण घेऊन आज डॉक्टर, वकील, अधिकारी, प्रगतीशील शेतकरी तसेच परदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या शिस्तप्रियतेमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही त्यांचा विशेष सन्मान आणि आदर होता.
“कडक शिस्तीतून घडवले पिढ्यान् पिढ्या विद्यार्थी”
त्या काळात पूर्व हवेलीतील अनेक गावांतील पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी एंजल हायस्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला, आणि त्या विश्वासाच्या मुळाशी होत्या त्रिवेणी मॅडम.
शाळेत कडक शिस्त, नियमित अध्यापन, व विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अनेक पालक मिटिंग्समध्ये त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे महिलांचा सहभाग लक्षणीय असे — कारण त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची खरी भागीदार बनल्या होत्या.
माजी विद्यार्थी संघटनेतर्फे श्रद्धांजली…
एंजल हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अध्यक्ष कमलेश दत्तात्रय काळभोर यांनी सौ. घाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले “त्रिवेणी मॅडम यांनी आम्हा विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच दिले नाही, तर आयुष्य कसं घडवायचं हे शिकवलं. त्यांच्या जाण्याने आमचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती.”
समाजमनातील स्थान…
त्यांच्या जाण्याने एंजल हायस्कूल परिवार, माजी विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे योगदान, त्यांची शिस्तप्रियता आणि प्रेमळ आठवण पूर्व हवेलीतील प्रत्येकाच्या मनात कायम राहील.
Editer sunil thorat



