निमसाखर खूनप्रकरणी टोळीप्रमुख राजु भाळे व १२ साथीदारांवर मोक्का कारवाई…

संपादक – डॉ गजानन टिंगरे
पुणे : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्रेय वादातून झालेल्या हल्ल्यातून उत्तम जाधव (वय ३४, रा. खोरोची) यांचा निर्घृण खून प्रकरणी टोळीप्रमुख राजेंद्र ऊर्फ राजु महादेव भाळे आणि त्याच्या १२ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उत्तम जाधव हे प्लॅसर दुचाकीवरून आपल्या जेसीबी चालकाला जेवणाचा डबा देण्यासाठी निमसाखर गावातील वीर वस्ती परिसरातून जात होते. त्यावेळी टोळीप्रमुख राजु भाळे, नाना भाळे, तुकाराम खरात, निरंजन पवार, रामा भाळे, दादा आटोळे, शुभम आटोळे, स्वप्नील वाघमोडे आणि इतर साथीदार चारचाकी व दुचाकीवरून येऊन त्यांच्या गाडीला अडवले. “तुला लय मस्ती आलीय का? तू आमच्या शत्रूंना मदत करतोस, आमच्या भांडणात मध्यस्थी करतोस” असे म्हणत त्यांनी लोखंडी कोयते, तलवारी व दगडांनी जाधव यांच्यावर डोक्यावर, पाठीवर, पायावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिकांनी त्यांना अकलुज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांची तत्परतेची कारवाई…
घटनेनंतर वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. विविध भागात शोध मोहिमा राबवून आरोपी राजु भाळेसह १० जणांना अटक करण्यात आली. पुढील तपासात आणखी ३ आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांनाही गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड…
तपासादरम्यान आरोपींच्या पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद समोर आली. राजु भाळे याच्यावर तब्बल १२ गुन्हे, तर रामदास भाळे, स्वप्नील वाघमोडे, मयुर पाटोळे, अशोक यादव, सनि हरिहर यांच्यावर प्रत्येकी २ गुन्हे, तुकाराम खरात, धनाजी मसुगडे, नाना भाळे यांच्यावर प्रत्येकी ३ गुन्हे, निरंजन पवारवर ५ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे धनाजी मसुगडे व निरंजन पवार यांच्यावर यापूर्वीही मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.
मोक्का कारवाईचा निर्णय…
या टोळीचे इंदापूर, माळशिरस, नातेपुते परिसरात वर्चस्व वाढवून आर्थिक फायदा घेण्यासाठी सातत्याने संघटित गुन्हेगारी कृत्ये सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने, या कृत्यांना वेळीच आळा घालण्यासाठी मोक्का अंतर्गत कठोर कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रस्तावाला मान्यता देऊन विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी कलम ३(१)(i)(ii), ३(२), ३(४), ४ अंतर्गत कारवाईची मंजुरी दिली.
पुढील तपास कर्तबगार पोलीस…
या प्रकरणाचा पुढील तपास डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग करत आहेत. कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
Editer sunil thorat




