दिवाळीनिमित्त घर बंद असल्याचा फायदा ; लोणी काळभोरमध्ये ४ लाखांची घरफोडी…
बाजारमळा परिसरात घटना ; घरातील रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले...

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर : दिवाळीनिमित्त सर्वजण मूळगावी गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करत रोख रकमेसह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरात उघडकीस आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बालाजी लक्ष्मण कुरवडे (वय ३२, रा. सर्वे नंबर २३०८, बाजारमळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरवडे हे इलेक्ट्रिकलचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिवाळी सुट्टीमुळे ते २२ ऑक्टोबर रोजी आपल्या मूळगावी उंद्री (ता. केज, जि. बीड) येथे गेले होते. शनिवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी सुमारास त्यांचे शेजारी संतोष देशमुख यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ कुरवडे यांच्याशी संपर्क साधला असता, “आम्ही अजून गावीच आहोत,” असे त्यांनी सांगितले.
कुरवडे यांनी देशमुख यांना घरात पाहणी करण्यास सांगितले असता, घरातील कुलूप तोडलेले आणि कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसून आले. चोरट्यांनी घरातील ९० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे २ तोळे ९ ग्रॅम दागिने (मणीमंगळसूत्र, झुमके, अंगठ्या, काड्या, कुडके व बदाम) असा ऐवज चोरून नेला आहे. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे चार लाख रुपये एवढी आहे.
घटनेनंतर कुरवडे हे गावीवरून परत आल्यावर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे पुढील तपास करत आहेत.
Editer sunil thorat



