
मांजरी (हडपसर) : दि. २८ नैसर्गिक ओढ्यात सांडपाणी सोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे महापालिकेने शहापूरजी पालमजी बांधकाम कंपनीच्या मांजरी-शेवाळेवाडी येथील ‘जॉयव्हिला’ गृहप्रकल्पावर तब्बल दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय परिसरात राडारोडा टाकून उपद्रव केल्याबद्दल अतिरिक्त पंधरा हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या निर्देशानंतर ही तातडीची पावले उचलण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्तांनी दहा दिवसांपूर्वी शेवाळेवाडी-मांजरी परिसराचा दौरा करून स्थानिक समस्या पाहिल्या. या दौऱ्यात ओढ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले होते. आयुक्तांनी तातडीने संबंधित बांधकाम कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, नैसर्गिक ओढ्यात सांडपाणी सोडल्याबद्दल कंपनीला दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या निरीक्षणानुसार, या प्रकारामुळे परिसरात चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका तसेच दुर्गंधीचा त्रास वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सांडपाणी सोडणे त्वरित थांबवावे आणि दंडाची रक्कम जमा करावी, अशा स्पष्ट सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून या प्रकल्पाविषयी तक्रारी होत आहेत.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले,
“जॉयव्हिला प्रकल्पाचे काम गेली चार-पाच वर्षे सुरू असून येथे सुमारे दोन हजार परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. हे कामगार वारंवार नशेत गावात फिरतात, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सांडपाण्यासोबतच प्रकल्पातील राडारोडा इतरत्र टाकला जातो, तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही झाली आहे. याबाबत आम्ही पालिका आणि पोलिस आयुक्त कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. अखेर आयुक्तांच्या लक्षामुळे या प्रकल्पावर मोठी कारवाई झाली, हे स्वागतार्ह आहे.”
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नैसर्गिक ओढे व पर्यावरण रक्षणासाठी इतर प्रकल्पांवरही अशाच कठोर कारवाया व्हाव्यात, अशी मागणी स्थानिक स्तरावर होत आहे.
Editer sunil thorat




