लोणी काळभोर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : दुचाकी चोरट्याकडून चोरीस गेलेली दुचाकी, रिव्हॉल्वर आणि १० जिवंत काडतुसे जप्त…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करताना त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर, दहा जिवंत काडतुसे आणि ३० बनावट चाव्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र बबनराव काळभोर (वय ५५, रा. लोणी काळभोर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अरुण बाबुराव देशमुख (वय ६७, रा. श्रीनिवास सोसायटी, सुखसागरनगर, पुणे) यास अटक करण्यात आली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी काळभोर यांनी आपली ॲक्टीवा दुचाकी (एमएच १२ क्यूडी ३२३३) लोणी काळभोर येथील स्मशानभूमीसमोर पार्क केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या पथकाने सुमारे १६५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात आरोपी दुचाकीसह बिबवेवाडीच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४० वाजता आरोपीस अटक केली.
तपासात आरोपीकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील तपासात पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी २९ ऑक्टोबर रोजी घरझडती घेतली असता एक रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे आणि ३० बनावट चाव्या असा अंदाजे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
तपासादरम्यान आरोपी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत असल्याचे समोर आले. पोलिसांनी अज्ञात आरोपी असतानाही अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीचा शोध लावला आणि गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांचे पथक अंमलदार सातपुते, शिरगिरे, कुदळे, पाटील, माने, विर, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, दडस, गिरी यांनी ही कारवाई केली.
Editer sunil thorat



