
लोणी काळभोर (ता. हवेली) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागेश अंकुश काळभोर यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या निवडीमुळे गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, आजच त्यांचा वाढदिवस असल्याने सरपंचपदाची ही निवड त्यांच्यासाठी दुग्धशर्करा योग ठरली आहे.
मागील सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवड प्रक्रियेत, विहीत मुदतीत नागेश काळभोर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संदीप झिंगाडे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे आणि ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी यांच्या उपस्थितीत नागेश काळभोर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. ग्रामस्थांनी नागेश काळभोर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, बाजार समिती संचालक प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, गणेश कांबळे, बापू बोरकर, राजेंद्र काळभोर, बाळासाहेब काळभोर, संजय गायकवाड, सविता जगताप, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष युवराज काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील सरपंच निवडणुकीत नागेश काळभोर यांचा एका मताने पराभव झाला होता. सत्ताधारी गटातील मतभेदांमुळे त्या वेळी राहुल काळभोर यांची ९ विरुद्ध ८ मतांनी सरपंचपदी निवड झाली होती. मात्र, आता सर्व गटांनी एकत्र येत नागेश काळभोर यांना बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिल्याने ग्रामपंचायतीत ऐक्याचे चित्र दिसत आहे.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सरपंच नागेश काळभोर म्हणाले, “मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार. गट-तट बाजूला ठेवून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना सोबत घेऊन लोणी काळभोरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
Editer sunil thorat




