२१ वर्षानंतर अंगारकी चतुर्थी–श्रावण योग; थेऊर श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी…

पुणे (हवेली) : तब्बल २१ वर्षांनंतर आलेल्या अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिन्याच्या अद्वितीय योगामुळे हवेली तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि.१२) पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली.
धार्मिक कार्यक्रम व व्यवस्था…
पहाटे पुजारी अजय आगलावे यांनी श्रीं ची महापूजा केली, त्यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त केशव विद्वांस यांच्या उपस्थितीत विशेष पूजा पार पडली. भाविकांना सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर प्रांगण व परिसरात मंडप, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट व तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुपारी देवस्थानतर्फे उपवासाची खिचडी वाटप, सायंकाळी ह.भ.प. उगले महाराज (आळंदी देवाची) यांचे कीर्तन आणि चंद्रोदयानंतर छबिना काढण्यात आला. कार्यक्रमानंतर ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सुरक्षा व वाहतूक व्यवस्था…
मोठी गर्दी अपेक्षित असल्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली १ अधिकारी, १० कर्मचारी, १० होमगार्ड तसेच देवस्थानचे ९ स्वयंसेवक अशी कडक सुरक्षा तैनात होती. ग्रामपंचायतीकडून स्वतंत्र पार्किंगची सोयही करण्यात आली होती.
तथापि, दुपारी थेऊरकडे जाणाऱ्या दत्तनगर परिसरात एक अवजड ट्रक इंजिन निकामी झाल्याने दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह पुणे–सोलापूर व पुणे–नगर महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतूक विभागाने ट्रक ट्रेनच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे…
विशेष योग 👉🏻 २१ वर्षांनंतर अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिन्याचा संगम
स्थान 👉🏻 थेऊर, हवेली तालुका
प्रमुख धार्मिक कार्यक्रम 👉🏻 महापूजा, विशेष पूजा, रक्तदान शिबिर, कीर्तन, छबिना, महाप्रसाद
व्यवस्था 👉🏻 मंडप, दर्शनबारी, पिण्याचे पाणी, सुरक्षा, पार्किंग
सुरक्षा दल 👉🏻 १ अधिकारी, १० कर्मचारी, १० होमगार्ड, ९ स्वयंसेवक
विशेष सहकार्य 👉🏻 चिंचवड देवस्थान ट्रस्ट, तर्पण ब्लड सेंटर, ग्रामपंचायत, पोलीस विभाग
Editer sunil thorat






