तळेगाव–उरुळी कांचन प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत शेतकऱ्यांच्या भावना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसमोर मांडल्या… खासदार डॉ अमोल कोल्हे…
मार्ग रद्द करा किंवा पर्यायी तांत्रिक मार्ग निवडण्याची ठाम मागणी...

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांची पुन्हा एकदा खासदार डॉ अमोल कोल्हे भेट घेऊन तळेगाव ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भात स्थानिक शेतकरी, भूमीपुत्र आणि ग्रामस्थांच्या तीव्र भावना निवेदनाद्वारे त्यांच्या समोर मांडण्यात आल्या.
हा प्रस्तावित रेल्वे मार्ग केवळ नकाशावर काढलेली एक रेषा नसून, या मार्गामुळे अनेक पिढ्यांपासून कसत असलेली सुपीक शेती, शेतकऱ्यांचे जीवनमान, उपजीविका आणि अस्तित्व धोक्यात येणार आहे, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली. मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण झाल्यास शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती असून, त्याचा सामाजिक व आर्थिक परिणाम गंभीर स्वरूपाचा असेल, याकडे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रेल्वे मंत्र्यांच्या लक्षात आणले.
निवेदनाद्वारे “तळेगाव ते उरुळी कांचन हा प्रस्तावित रेल्वे मार्ग पूर्णतः रद्द करण्यात यावा किंवा किमान अत्याधुनिक तांत्रिक पर्यायांचा वापर करून जमीन अधिग्रहण टाळणारा अथवा अत्यल्प जमीन बाधित होईल असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात यावा,” अशी ठाम मागणी करण्यात आली.
या प्रस्तावित मार्गामध्ये बदल करण्यात आल्यास देहू, इंदोरी, झेंडेमळा, सांगुर्डी, मोई, निघोजे, तळवडे, चिंबळी, धानोरे, चऱ्होली, सोळू तसेच हवेली तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांनी या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना, शेतीचे नुकसान आणि सामाजिक परिणामांचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे याना दिल्याचे समजते.
या भेटीमुळे तळेगाव–उरुळी कांचन रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व भूमीपुत्रांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात या मार्गाबाबत सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



