कवडीपाट टोलनाका परिसर खळबळ, हॉटेल जयश्री येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची धडक कारवाई…पाहा व्हिडिओ

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गालगत कवडीपाट टोलनाका परिसरात असलेल्या हॉटेल जयश्री रेस्टोबार अँड लॉजिंग येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना गुप्त खबर्यामार्फत हॉटेल जयश्रीमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची ठोस माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत बोगस ग्राहक पाठवला. खात्री होताच पोलिसांनी अचानक छापा टाकत संपूर्ण सेक्स रॅकेट उघडकीस आणले.
पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या या नामांकित हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात होती. मात्र आता पोलिसांच्या कारवाईने या बेकायदेशीर धंद्याचा पुरता भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात हॉटेल मॅनेजर, मालक तसेच रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महामार्गालगत सुरू असलेल्या अशा अनैतिक आणि गुन्हेगारी धंद्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या धाडसी व ठाम भूमिकेमुळे हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कारवाई करण्यात येत असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कारवाईमुळे लोणी काळभोर पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, परिसरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणाची सविस्तर माहिती काही तासांत अधिकृतरित्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
Editer sunil thorat



