लोणी स्टेशन परिसरात गोरक्षकांची कारवाई; गोमांससदृश्य मांस विक्रीप्रकरणी तिघांना अटक, 80 हजारांचा मुद्देमाल जप्त…
तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : लोणी स्टेशन परिसरात गोमांससदृश्य जनावरांची कत्तल करून मांस विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी (ता. 8) पहाटे ही कारवाई झाली. लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना अटक करून सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अविनाश राजेंद्र सोनकांबळे (वय 38, भोसले वस्ती, लोणी काळभोर), शरीफ युसुफ कुरेशी (वय 42, राजधानी बेकरी मागे, लोणी स्टेशन) आणि शेरु पठाण (रा. पठारे वस्ती, लोणी स्टेशन) यांचा समावेश आहे. फिर्याद प्रकाश बाळकृष्ण खोले (वय 29, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) यांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोरक्षक प्रकाश खोले आणि त्यांचे सहकारी लोणी स्टेशन परिसरात पाळत ठेवून होते. गुरुवारी (ता. 7) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास, अविनाश सोनकांबळे आपल्या मारुती सुझुकी सुपर कैरी गाडीतून गोमांससदृश्य मांस शेरु पठाण यांना बिर्याणी बनविण्यासाठी देत असताना पकडला. पुढील तपासात, शरीफ कुरेशी याने आपल्या घराच्या मागे बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केल्याचे आणि मांस विक्रीसाठी कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 325 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1978 चे कलम 59(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 50 हजार रुपयांचा टेम्पो आणि 30 हजार रुपये किंमतीचे 100 ते 150 किलो मांस असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.
Editer sunil thorat




