
कासुर्डी (पुणे) : पर्यावरण रक्षण, हरित संवर्धन आणि समाजाला स्वच्छ–सुंदर वातावरण देण्याच्या उद्देशाने आनंदी जीवन फाउंडेशनतर्फे कासुर्डी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मदत हॉस्पिटल आणि मदत वृद्धाश्रम परिसरात १०० विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करून ‘झाडे लावा – झाडे जगवा’ आणि ‘एक लक्ष्य – एक लाख वृक्ष’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत आणले.
विविध फळझाडांचे रोपण…
या उपक्रमात चिकू, आंबा, जांभूळ, लिंबू यांसारख्या उपयुक्त, प्रदूषणनाशक आणि सावली देणाऱ्या झाडांचा समावेश करण्यात आला. परिसरातील वातावरण निरोगी आणि हरित ठेवण्यासाठी उपयुक्त अशी झाडे निवडण्यात आली होती. वृक्षारोपणाबरोबरच या झाडांची निगा, पाणीपुरवठा आणि जतन करण्यासाठी स्वतंत्र पथक देखील कार्यरत राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
उपक्रमाचे नेतृत्व डॉ. मोहसीन पठाण यांच्याकडून…
हा संपूर्ण कार्यक्रम आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहसीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांनी फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीबद्दल बोलताना सांगितले की, “समाजासाठी, पर्यावरणासाठी आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविण्याची परंपरा आमची आहे. वृक्षारोपण हे केवळ रोप लावणे नाही, तर भविष्यासाठी हिरवे वारस निर्माण करणे आहे.”
फाउंडेशनचे सातत्यपूर्ण सामाजिक कार्य…
आनंदी जीवन फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून नियमितपणे सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये मोफत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, महिलांसाठी ‘सुपर होम मिनिस्टर – पैठणी स्पर्धा’, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण गोरगरिबांना अन्नदान कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. फाउंडेशनचे कार्य समाजात प्रभावीपणे पोहोचत असून नागरिकांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमाला मान्यवर व स्वयंसेवकांची उपस्थिती…
या वृक्षारोपण मोहिमेत फाउंडेशनचे सचिव आरिफ शेख, खजिनदार नूर मोहम्मद पठाण, तरन्नुम पठाण, सारिका भुजबळ, बजरंग राऊत, अण्णा चव्हाण, भरत सुरवसे, साहिल पठाण, आबा सोनवणे, काळूराम शेंडगे, शबशनम शेख, दौलत ठोंबरे, संतोष आखाडे, मयूर आखाडे, ऋषिकेश राजवाडे यांसह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
स्वयंसेवकांनी झाडे लावण्याबरोबरच जतनाची जबाबदारीदेखील मनापासून स्वीकारत परिसरात स्वच्छता, देखभाल आणि हरित संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाला मदत हॉस्पिटल व मदत वृद्धाश्रम प्रशासनानेही सहकार्य केले.
निसर्ग संवर्धनासाठी महत्वपूर्ण पाऊल…
या उपक्रमामुळे कासुर्डी परिसरात हरित आच्छादन वाढण्यास मदत होणार असून भावी पिढ्यांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे समाजातील नागरिकांनी नमूद केले. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, ‘हरित कासुर्डी’ या उद्दिष्टाकडे टाकलेले हे पाऊल मोलाचे ठरले आहे.
Editer sunil thorat




