कदमवाकवस्तीत मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलिसांच्या निष्क्रिय गस्तीवर नागरिकांचा संताप…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात मंगळवारी (दि. २) मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास पाच जणांच्या चोरट्यांच्या टोळीने घरफोडीचा प्रयत्न केला. हातात कोयत्यासारखी धारदार हत्यारे, तोंडावर कापड आणि अंगात स्वेटर घातलेल्या या चोरट्यांनी भारत कदम यांच्या घराच्या दरवाजावर ताव मारत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजावर आवाज झाल्याचे घरातील सदस्यांना भान आल्याने ते जागे झाले आणि त्यांच्या हालचाली लक्षात येताच चोरटे गडबडून पळ काढला. हा सर्व प्रकार घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून फुटेजमध्ये किमान पाच जण दिसत आहेत.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. चोरट्यांनी चेहऱ्यावर कापड बांधले असल्याने ओळख पटत नसली तरी वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे दिसते. घरमालक वेळेवर जागे झाल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा धारदार हत्यारे आणि टोळीचा अंदेश पाहता गंभीर घटना घडली असती, अशी चर्चा परिसरात आहे.
दरम्यान, कदमवाकवस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढू लागल्या असून दुचाकी चोरी, सदनिकांचे कडी–कोयंडे तोडून घरफोडी, तसेच लग्नसोहळ्यातून ऐवज लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीदेखील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त अत्यंत कमी असल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत. विशेषतः कवडीपाट परिसरातील गणराज पार्क, स्टार सिटी भापकर प्लॉटिंग, हनुमान मंदिर चौक या भागांत रात्री पोलीसांची गाडी दिसत नाही. नाईट राऊंड होत नसल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे, असे प्रत्यक्ष अनुभवावरून नागरिक सांगत आहेत.
या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असलेल्या या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर भूमिका घ्यावी, नियमित गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील चोरट्यांची ओळख पटवून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. चोरीचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याने लोणी काळभोर पोलिसांची गस्त नावालाच आहे का? असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कदमवाकवस्तीतील घरफोडीच्या या मध्यरात्रीच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीची कारवाई आणि वाढीव पोलिस उपस्थिती अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat



