
कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन परिसरातील सेंट टेरेसा शाळेजवळ एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने शनिवारी (दि. २०) सकाळी परिसरात खळबळ उडाली. ही घटना सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मधुकर विठ्ठल गिरिगोसावी (वय ६९, रा. श्री राम मंदीर, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सकाळच्या सुमारास नागरिकांना शाळेजवळील मोकळ्या जागेत एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुळशीदास जाधव व महेंद्र आगळे घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांनी संबंधित व्यक्तीस उपचारासाठी विश्वराज रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका (अटॅक) आल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.
सूत्रांच्या माहितीनुसार मधुकर गिरिगोसावी यांच्यावर यापूर्वी दवाखान्यात उपचार सुरू होते. रात्री गारठ्याचा त्रास वाढल्याने ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. असे पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांनी सांगितले.
Editer sunil thorat



