
मांजरी बुद्रुक (हडपसर) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट, मांजरी बुद्रुक यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग आधार मेळावा तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार असून, दिव्यांग कल्याण केंद्र, मांजरी बुद्रुक (प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी) येथे हे शिबीर होणार आहे.
या उपक्रमात डॉ. के. टी. पलुसकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांचे सहकार्य लाभणार असून दिव्यांग बांधवांसाठी विविध मोफत आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये रक्ततपासणी, एक्स-रे आदी तपासण्यांचा समावेश आहे.
या दिव्यांग आधार मेळाव्याचा मुख्य उद्देश दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समानतेने सहभागी करून घेणे, त्यांना समान हक्क व संरक्षण, तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व्यापक जनजागृती करणे हा आहे, अशी माहिती जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय ननवरे यांनी दिली.
कार्यक्रमांतर्गत गरजू दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप, दिव्यांगांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी दिव्यांग बांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था
असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या मानवतावादी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय ननवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०१०४४४
Editer sunil thorat



