
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कदमवाकवस्ती येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या स्नेहसंमेलनामागील मुख्य उद्देश होता.
या स्नेहसंमेलनात शेकडो पालक व नागरिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गायन, वादन, कराटे आदी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. बालकलाकारांनी आत्मविश्वासाने केलेल्या सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह दाद आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
कलेच्या विविध रंगछटांचे दर्शन घडवणारी “सतरंगी” ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि विचारांचा जागर करणारे “शिवचरित्र” हे विशेष सादरीकरण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन शाळेचे चेअरमन नितीन काळभोर, सेक्रेटरी मंदाकिनी काळभोर आणि सीईओ प्रथमेश काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, लोणी काळभोर गावचे सरपंच नागेश काळभोर, माजी सरपंच राहुल काळभोर तसेच शिवशाहीर महेश खुळपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री भाग्यश्री न्हालवे आणि सिनेअभिनेते विनायक चौगुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. नृत्य शिक्षक अश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देखणी, तालबद्ध व रंगतदार नृत्ये सादर केली. संगीत शिक्षक कार्तिक गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुमधुर गायन सादर करून रसिकांची मने जिंकली, तर संगीत शिक्षक शिवराज साने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तालबद्ध वादनातून कार्यक्रमात रंग भरला.
याशिवाय कराटे शिक्षक प्रफुल्ल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक कराटे प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. संपूर्ण कार्यक्रमाची आकर्षक नेपथ्य व्यवस्था कला शिक्षक दिपक शितोळे यांनी अत्यंत देखण्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलोफर तांबोळी, ऋतुजा देशमुख आणि श्वेता मेटे यांनी उत्स्फूर्तपणे केले, तर पर्यवेक्षक पायल बोळे यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे शाळा प्रशासनाने यावेळी नमूद केले.
Editer sunil thorat









