
हडपसर (पुणे) : दि. २२ डिसेंबर रयत शिक्षण संस्था, सातारा आणि एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रयत अविष्कार संशोधन प्रकल्प महोत्सव २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयालगत असलेल्या विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, माळवाडी, हडपसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या संशोधन महोत्सवाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन तथा आमदार चेतन तुपे – पाटील उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (भा.प्र.से. निवृत्त) हे असतील. तसेच कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख (भा.प्र.से. निवृत्त), सहसचिव (उच्च शिक्षण) प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप तुपे व अमर हरिदास तुपे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
‘रयत अविष्कार संशोधन प्रकल्प महोत्सव २०२५’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देणे, नवोन्मेषी आणि सर्जनशील कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन संस्कृती अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प, समाजोपयोगी उपक्रम तसेच तंत्रज्ञानाधारित नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. विजय कुंभार आणि प्रो. डॉ. रंजना जाधव कार्यरत असून, संपूर्ण आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणाऱ्या या महोत्सवाला शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Editer sunil thorat



