
हडपसर (पुणे) : जे.एस.पी.एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि पुणे महानगरपालिका अग्निशामक दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी जे.एस.पी.एम. शैक्षणिक संकुल, हडपसर येथे अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत योग्य कृती करण्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात काळे-बोराटे नगर अग्निशामक दलाचे प्रभारी अधिकारी विलास दडस व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आग लागल्यास घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आणीबाणीच्या प्रसंगी आग विझवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी अग्निशमन यंत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी PASS ही सोपी व उपयुक्त पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
त्यामध्ये P (Pull) – पिन ओढणे, A (Aim) – आगीच्या मुळाशी नेम धरणे, S (Squeeze) – लीव्हर दाबणे, S (Sweep) – डावीकडून उजवीकडे फवारा मारून आग विझवणे, या टप्प्यांची माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
डिप्लोमा फार्मसी तसेच शैक्षणिक संकुलातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हे प्रात्यक्षिक स्वतः करून पाहिले. यामुळे आपत्कालीन प्रसंगात घाबरून न जाता प्रसंगावधान राखून कशी कृती करावी, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण त्यांना मिळाले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग लागल्याच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीसह सुरक्षिततेच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमास जे.एस.पी.एम. शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे, डॉ. मारुती काळबांडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल प्र. आडकर होते. तसेच शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रमुख उपस्थित होते. यामध्ये डॉ. खुशाल मुंडे, शेंडगे सर (डी.एड.), डॉ. हाके (एमबीए), डॉ. विनोद कुलकर्णी (सायन्स कॉलेज), डॉ. पोटनिस (बी. फार्मसी) यांचा समावेश होता.
सर्व मान्यवरांनी या प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाल्याचे नमूद करत पुणे महानगरपालिका अग्निशामक दलाचे आभार मानले. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वापरात असलेली विविध उपकरणे, साधने व त्यांचा उपयोग कसा करावा याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी अग्निशामक दलातील प्रथमेश नवले, राजू शेख, दत्तात्रय चौधरी व अजय तांबे यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले तसेच भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत योग्य सूचना पाळण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाचे आयोजन प्रा. रविराज जाधव व प्रा. निकिता कोलते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशीद, स्वप्नाली सावंत, प्रियांक महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, कल्पना सुरवसे व आकांक्षा जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
Editer sunil thorat






