जनता जनार्दनच ठरवणार सत्ता! विकासाला कौल की पक्षांतराला दणका, 20 तारखेला 23 नगरपरिषदांत ऐतिहासिक मतदान

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा थरार निर्णायक वळणावर पोहोचला आहे. विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 23 नगरपरिषदांमध्ये व नगरपंचायतींमध्ये (दि. 20 डिसेंबर) मतदान होणार असून, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन सत्तेचा ‘महा-फैसला’ जाहीर होणार आहे.
या निवडणुकांमध्ये अध्यक्ष आणि सदस्यपदांसह एकूण 143 जागांसाठी मतदार आपला कौल देणार आहेत. 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानासोबतच या टप्प्याचा निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.
विकास विरुद्ध पक्षांतर – जनता सब जाणती…
यावेळी निवडणूक केवळ उमेदवारांची नसून विकासाची की सत्तालोलुपतेची, हा खरा प्रश्न जनता जनार्दनसमोर उभा आहे. या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे उमेदवार निवडून द्यायचे की विकासाचा ठोस अजेंडा मांडणाऱ्या विकास पुरुषांच्या समोरील बटन दाबायचे, याचा निर्णय उद्याच्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. जनता आता सब जाणती असून, कोणाला घरी बसवायचे आणि कोणाला सत्तेची संधी द्यायची, हे ठरवण्याची ताकद जनतेकडेच आहे. त्यामुळे विकासालाच मत मिळणार, यात शंका नाही, असा ठाम सूर सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
पुणे, ठाणे ते विदर्भ – राज्यभर मतदान…
उद्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, पुणे जिल्ह्यातील बारामती व फुरसुंगी–उरुळी देवाची, सोलापूरमधील अक्कलकोट व मंगळवेढा, तसेच साताऱ्यातील महाबळेश्वर व फलटण येथे मतदान होणार आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर (घुग्गुस) येथेही मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रशासन सज्ज; प्रचाराचा रणसंग्राम…
निवडणूक आयोगाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असून मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला असून दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे प्रचाराचा रणसंग्राम रंगला होता.
21 डिसेंबरला सत्ता-समीकरणांचा फैसला…
उद्याच्या मतदानानंतर 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, कोणाच्या हाती सत्ता, कोणाला घरचा रस्ता, हे स्पष्ट होणार आहे. जनता जनार्दनच अंतिम निर्णायक आहे, आणि विकासाला मत मिळणार की संधीसाधूंना दणका बसणार, याचा फैसला मतपेटीतूनच होणार आहे.
Editer sunil thorat



