
हडपसर (पुणे) : दि. १९ डिसेंबर २०२५ स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अंतर्गत ‘रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ चा शुभारंभ अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ग्रामीण, शहरी व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा सविस्तर परिचय डॉ. छाया सकटे यांनी करून दिला. मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश जगताप (जिल्हा उपनिबंधक, पुणे) उपस्थित होते. तसेच अरविंद तुपे व रमेश तुपे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश जगताप म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, वेळेचे योग्य व्यवस्थापन, शिस्त, सातत्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण व मध्यमवर्गीय विद्यार्थीही मोठ्या पदांवर पोहोचू शकतात, असे त्यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी सांगितले की, महाविद्यालयात सुरू करण्यात आलेली रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, सरळसेवा आदी विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, अभ्यासक्रम, सराव परीक्षा व शंका निरसन सत्रे या अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या यशासाठी महाविद्यालयाकडून आवश्यक ते सर्व शैक्षणिक सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या उद्घाटन कार्यक्रमास उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अकॅडमीचे दैनंदिन कामकाज, मार्गदर्शन वर्ग व स्पर्धा परीक्षांचे नियोजन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अजित भोसले यांनी आभार प्रदर्शन केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता मुखेकर यांनी केले.
Editer sunil thorat




