मुलगा होण्याचे आमिष, बोगस उपचारांचा खेळ, केडगावच्या लवंगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा कथित फसवणूक कारनामा उघड…
विवाहित महिलेची तीन लाखांची आर्थिक व मानसिक लूट...

केडगाव (ता. दौंड) : मुलगा होण्यासाठी उपचार करण्याचे खोटे आमिष दाखवत एका विवाहित महिलेकडून तब्बल तीन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार केडगाव येथील लवंगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण दौंड तालुक्यात संतापाची लाट उसळली असून संबंधित डॉक्टर व हॉस्पिटलवर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, लवंगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर स्वाती लवंगे यांनी “मुलगा होण्यासाठी विशेष औषधोपचार”, “अत्याधुनिक तंत्रज्ञान” आणि “निश्चित यश” असे दावे करत उपचार सुरू केले. भावनिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत टप्प्याटप्प्याने सुमारे तीन लाख रुपये उकळण्यात आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेने मोठ्या विश्वासाने उपचार सुरू ठेवले. मात्र उपचारांनंतर कोणताही वैद्यकीय निष्कर्ष, अहवाल किंवा अपेक्षित परिणाम मिळाला नाही. याबाबत विचारणा केल्यावर संबंधित डॉक्टरांकडून टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे व वेळकाढूपणा सुरू झाला. पुढील चौकशीत हे उपचार केवळ दिखावा असून त्यामागे कोणतीही अधिकृत वैद्यकीय प्रक्रिया, नोंद किंवा शास्त्रीय आधार नसल्याचे समोर आले आहे.
या कथित फसवणुकीमुळे पीडित महिलेला मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि सामाजिक अपमान सहन करावा लागला. अखेर महिलेने केडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. उपचारांच्या पावत्या, संभाषणाचे पुरावे आणि इतर कागदपत्रांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गंभीर बाब म्हणजे, या हॉस्पिटलविरोधात यापूर्वीही काही रुग्णांनी उपचारांबाबत संशय व्यक्त केल्याचे समोर येत आहे. मात्र या प्रकरणामुळे लवंगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कथित बोगस उपचारांचा पर्दाफाश झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी, संबंधित हॉस्पिटलची मान्यता, डॉक्टरांची पात्रता, उपचार पद्धती आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी ठाम मागणी सामाजिक संघटना व जागरूक नागरिकांकडून होत आहे. “मुलगा होण्यासाठी” अशा अंधश्रद्धा, भावनिक दबाव आणि महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. याबाबत संबंधित हाॅस्पिटल कडून प्रतिक्रिया मिळाली नाही.
Editer sunil thorat



