
लोणी काळभोर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ‘सावित्रींच्या लेकींचा’ सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून हजारो आंबेडकरी अनुयायी मानवंदना देण्यासाठी येत असतात. या अनुयायांसाठी थेऊर फाटा परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून जेवण व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. हा संपूर्ण उपक्रम पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार राबवण्यात आला.
यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत काटेकोर, शिस्तबद्ध व नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवण्यात आला होता. “मुंगी जरी चालली तरी ती दिसेल,” अशा शब्दांत उपस्थित नागरिकांनी या बंदोबस्ताचे कौतुक केले. आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या पद्धतीचा हा बंदोबस्त असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एका वर्षात लोणी काळभोर परिसरात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य झाले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. पत्रकार जोगदंड यांनी आपल्या मनोगतात पोलिस प्रशासनाच्या कार्याचा गौरव करत, भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी थेऊर परिसरात योग्य नियोजन करण्यात आल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
या यशस्वी नियोजन व बंदोबस्ताबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचा सामाजिक कार्यकर्ते सुजित कांबळे, संजय भालेराव, वि. वि. कार्यकारी सोसायटी लोणी काळभोरचे संचालक तसेच पत्रकार जोगदंड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या शितल सुजित कांबळे यांच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजासाठी योगदान देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘सावित्रींच्या लेकी’ म्हणून गौरव करण्यात आला. यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस हवालदार वैजनाथ शेलार, महिला पोलीस हवालदार ज्योती नवले, अश्विनी पवार, महिला पोलीस शिपाई उषा थोरात, वनिता यादव, कोमल आखाडे, आरती जमाले, रेश्मा थोरात, सुवर्णा केंद्रे, माधुरी चौधरी, उज्वला डिंबळे तसेच मिना वाघाडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे सामाजिक कार्यकर्ते, पोलिस प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, सामाजिक सलोखा, महिला सन्मान व सार्वजनिक सुरक्षिततेचा आदर्श लोणी काळभोर परिसरात निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
Editer sunil thorat






