पुणे : खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर पुणे आरटीओच्या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे खासगी वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, पुणे आरटीओकडून शहराच्या वेगवेगळ्या भागांत सात ठिकाणे शोधून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
कारवाईसाठी सहा पथके तैनात..
शहर आणि शहराबाहेर प्रवासासाठी कार शेअरिंगसाठीचे एका खासगी ऍपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. संबंधित वाहनचालक पुण्यातून कोणत्या शहरात जाणार आहे आणि त्याच्या कारमध्ये किती जागा आहेत, याबाबत त्या ऍपवर माहिती अपलोड केली जाते. त्यानुसार प्रवास करणारे नागरिक त्या कारमधील सीटची ऑनलाईन बुकिंग करतात. मोटार वाहन कायद्यानुसार खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदा आहे.
तरीदेखील ऍपच्या माध्यमातून अशी प्रवासी वाहतूक वाढल्याच्या तक्रारी पुणे आरटीओकडे आल्या होत्या. त्यामुळे पुणे आरटीओने खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी वाघोली, विमानगर, हडपसर, स्वारगेट, चांदणी चौक, नवले पूल अशी ठिकाणे निवडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. आरटीओकडून यासाठी वायूवेग पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
वायूवेग पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः डमी प्रवासी म्हणून खासगी ऍपवरून बुकिंग करतात. त्यामध्ये सर्व पुरावे गोळा करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे, तसेच संबंधित गाडी जप्त देखील केली जाऊ शकते. त्या गाडीमध्ये प्रवासी आढळून आल्यास प्रत्येक प्रवाशाला टॅक्स आकारला जाऊ शकतो, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा