राजकीयसामाजिक

अनेक अपघातानंतर प्रशासनाला आली जाग; अखेर कठडे हटवण्याचे काम तातडीने सुरू..

थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे हटविण्याची नागरिकांची मागणी अनेक वर्षापासून..नागरिकांच्या मागणीला यश...

तुळशीराम घुसाळकर (हवेली) 

पुणे (हवेली) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावर कठड्याला धडकून अनेक निष्पाप नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. याच उड्डाणपुलावर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२ जानेवारी) रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

यामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलावर असलेले कठडे गुरुवार (९ जानेवारी) पासून काढण्यास सुरवात केली आहे.

       पुणे-सोलापुर महामार्गावरून पुणे-नगर अथवा पुणे -नाशिक महामार्गावराला अथवा पुण्याच्या गर्दीतून बाहेर जायचे असेल तर अनेक वाहनचालक वेळ आणि अंतर वाचवण्यासाठी थेऊर फाट्याच्या मार्गाचा वापर करतात. परंतु थेऊर फाट्याकडून थेऊरच्या दिशेकडे अथवा नगर रस्त्यावरून पुणे सोलापूर महामार्गाकडे जात असताना चालकांना रेल्वेच्या उड्डाणपुलावरून जावे लागते. या उड्डाणपूलावर दोन्ही बाजूकडे मध्यभागी असलेले कठडे हे चालकांसाठी जिवघेणे बनले होते. वाहनचालकांना गाडी चालविताना हे कठडे अचानक रस्त्यातच येत असल्याने वारंवार अपघात होत होते. विशेषतः दुचाकी चालकांना समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांची लाईट चमकल्याने कठडे दिसत नव्हते, त्यामुळे बहुतांशी अपघात हे दुचाकी चालकांचे होत होते. त्यामुळे थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूलावरील कठडा मृत्यूचा सापळा बनत चालला होता.

       थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे हटविण्याची मागणी नागरिक अनेक वर्षापासून करीत होते. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होत नव्हती. यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच कुंजीरवाडी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकीतून या कठड्याला रेडीअम व छोटे छोटे रेडिअमचे पोल कठड्यावर लावण्यात आले होते. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना ते दिसत होते. परंतु काही कालावधीनंतर ते गायब होत असल्याने उड्डाणपूलावरुन दुचाकीस्वारांचा प्रवास धोक्याचा झाला होता. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात होते. तर काहीजण जायबंदी झाले होते.

       २ जानेवारी रोजी या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात रामेश्वर किशोर राठोड (वय २३) व श्याम गजमल जाधव (वय २९, दोघेही सध्या रा. टिळक नगर कात्रज, पुणे, मूळ रा. जामठी गाव, ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांचा जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

        या संदर्भात थेऊर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पै. युवराज काकडे यांनी थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील अपघाताची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व पीडब्लूडीचे (विशेष रस्ते) आर वाय पाटील यांना फोनद्वारे दिली होती. तसेच रेल्वे उड्डाणपुलावरील तत्काळ कठडे कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या एका टीमने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा सेफ्टी ऑडीट अहवाल पाठविला. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसात गुरुवार पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलावरील कठडे काढण्यास सुरवात केली आहे.

      हरेश गोटे (सरपंच-कुंजीरवाडी, ता. हवेली) 

       सरपंचपद स्विकारल्यापासून थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्यापासून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी ग्रामपंचायतीचे वतीने कठड्याला रेडीअम व रेडिअमचे पोल बसविले होते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात अपघात कमी झाले होते. परंतु या रस्त्यावरून नवीन चालक गाडीवरून जात असेल तर त्याच्यासमोर अचानक कठडे येत असल्याने अपघात होत होते. उड्डाणपुलावरील कठडे हटविण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. प्रशासनाकडून आजपासून कठडे काढण्यात सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा आता जीव जाणार नाही. याचा एकीकडे आनंद होत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या बाबत दुख: वाटत आहे.

      सचिन तुपे (माजी सरपंच – कुंजीरवाडी, ता. हवेली) 

      थेऊर रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून झालेल्या अपघाताची संख्या मोठी आहे. अपघात होण्यास हा कठडाच कारणभूत ठरत होता. वाहनचालकाच्या डोक्याला मोठी दुखापत होत होती. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जागीच अथवा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा कठडा जीवघेणा ठरत असल्याने वारंवार सर्वांनी पाठपुरावा करून हा कठडा काढण्यासाठी प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वळविले होते. त्यामुळे या मागणीला यश आले आहे.

        पै. युवराज काकडे (ग्रामपंचायत सदस्य- थेऊर)

        सार्वजनिक बांधकाम विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व पीडब्लूडीचे (विशेष रस्ते) आर वाय पाटील यांनी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ उड्डाणपुलावरील कठडे काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे काढण्यास आजपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे कठड्याला धडकून अपघात होण्याचे प्रमाण आपोआपच कमी होतील. व निष्पाप नागरिकांचे जीव वाचतील.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??