दिल्ली : भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी फार चांगली झाली नाही. बांगलादेशला घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल टीम इंडियाच्या टप्प्यात होती.
पण, त्यानंतर न्यूझीलंडकडून ३-० असा मानहानिकारक पराभव झाला आणि समीकरण बिघडले. त्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा महत्त्वाचा होता आणि भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले होते. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पर्थ कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. मात्र, त्यानंतर पुढील चारपैकी ३ कसोटीत पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाने ३-१ अशी मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर भारत WTC Final च्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचेही जेतेपद पटकावेल, असे वाटले होते. भारताला सलग दोन पर्वात उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण, यावेळेस टीम इंडिया फायनलमध्येही पोहोचू शकली नाही. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीही अत्यंत निराशाजनक राहिली. त्यामुळे बीसीसीआय खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेत आहे. त्यांनी खेळाडूंना इतरही प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जात आहे.
ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने घेतलेल्या आढावा बैठकीत काही मोठे निर्णय घेतले गेले आहेत. आता क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी कडक नियम करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार एखादा दौरा ४५ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची असेल, तर खेळाडूंच्या कुटुंबाला फक्त १४ दिवस त्या दौऱ्यावर राहण्याची परवानगी असेल आणि जर हा दौरा कमी दिवसांचा असेल तर कुटुंबियांसाठी हा कालावधी ७ दिवसांचा असू शकतो.
नव्या नियमानुसार कुटुंबीय संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंसोबत राहू शकत नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली त्याच्या पत्नी अनुष्का शर्मासह दाखल झाला होता. शिवाय जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल यांच्याही पत्नी या दौऱ्यावर स्टेडियमवर दिसल्या होत्या. त्याचवेळी काही खेळाडू टीम इंडियाच्या बसमधून प्रवास करत नसल्याचे दिसले. त्यांच्यासाठी आता सर्व खेळाडूंना संघासोबत एकाच बसमधून प्रवास करावा लागेल, हा नियम आणला गेला आहे.
गौतम गंभीरच्या वैयक्तिक व्यवस्थापकालाही व्हीआयपी बॉक्स किंवा टीम बसमध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये राहावे लागेल. जर खेळाडूंचे सामान १५० किलोपेक्षा जास्त असेल तर बीसीसीआय खेळाडूंना अतिरिक्त सामानाचे शुल्क देणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला १-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीही पात्र ठरू शकला नाही.
..काही ठळक मुद्दे..
👉🏻आता संपूर्ण दौऱ्यात पत्नी क्रिकेटपटूंसोबत राहू शकणार नाहीत.
👉🏻संघ कामगिरी सुधारण्यासाठी बीसीसीआय नवीन मार्गदर्शक तत्त्वे बनवत आहे.
👉🏻५ दिवसांच्या परदेश दौऱ्यात क्रिकेटपटूचे कुटुंब त्याच्यासोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहू शकते.
👉🏻मॅनेजरने मुख्य प्रशिक्षकासोबत राहावे यासाठीही नियम ठरवण्यात आले होते.
👉🏻सर्व खेळाडू फक्त टीम बसने प्रवास करतील, वेगळे प्रवास करू शकणार नाहीत.
👉🏻सहाय्यक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ देखील जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी निश्चित केला जाईल.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा