घरफोडीच्या गुन्ह्यातील ९ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व एक किलो वजनाची चांदीची वीट असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये हस्तगत..; तरडे.

पुणे (हवेली) : घरांत कोणीही नाही याची संधी साधून हवेली तालुक्यातील तरडे या गावातील बंगला फोडून तिजोरीमधील चालूबाजार भावाप्रमाणे सुमारे २८ लाखांच्या सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती.
या घरफोडीतील मुख्य आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करून सुमारे ९.५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी स्टीफनविक्टर वलेरवण लासराडो (वय ५१, रा. प्लॉट नं. ५२४, रेल्वे कोलस वस्ती रोड, तरडे ता हवेली जि- पुणे, मुळ रा बिल्डींग नं १५०, फ्लॅट नं. ४ डी. ४ था मजला रोड नं १ ब्लॉक नं ३. अलअमादी गर्व्हर्नरेट, देश कवेत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ४५, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारी, थेऊर कोलवडी रोड, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
ही घटना रेल्वे कोलस वस्ती परिसरात घडली असून १ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टीफनविक्टर लासराडो यांचा तरडे परिसरात बंगला आहे. ते बुधवार (२९ जानेवारी) रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कुटुंबासमवेत गावी गेले होते. शनिवार (१ फेब्रुवारी) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा त्यांना घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप अवस्थेत व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, मास्टर बेडरुममधील बेडच्या फरशीचे खाली खड्डा खादुन तयार करण्यात आलेल्या तिजोरीमधील स्टिलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने आढळून आले नाही.
घरात चोरी झाल्याची खात्री झालेनंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्याचा हार, अंगठी, नेकलेस, चैन व बांगडी सुमारे असा ३० तोळे सोन्याचे दागिने व ४ किलो २०० ग्रॅम चांदीची बिस्किटे, असा एकूण चालू बाजारभावाप्रमाणे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या पथकाला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शुक्रवार (७ फेब्रुवारी) रोजी सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलीस पथकाला तरडे येथील घरफोडी ही संगतसिंग कल्याणी याने केली असून तो थेऊर येथील वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारी उभा आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले. संगतसिंग कल्याणी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने घरफोडी व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजून दोन अशा तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
त्याचेकडून तरडे येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील ९ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व एक किलो वजनाची चांदीची वीट असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, सुनिल नागलोत, पोलिस अंमलदार बाजीराव वीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डिले, प्रदिप गाडे, मंगेश नानापुरे व चक्रधर शिरगीरे यांच्या पथकाने केली आहे.



