
लोणीकंद (ता. हवेली) : काशी विश्वेश्वर–अयोध्या दुसऱ्या टप्प्यातील देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने आयोजित भव्य संवाद मेळाव्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, पी.डी.सी.सी. बँकेचे संचालक व भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, “आपल्या लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी पै. किरण साकोरे सारख्या सक्षम युवा नेतृत्वाची आजच्या काळात नितांत गरज आहे.”
प्रदीप कंद म्हणाले, “आम्ही आजवर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहिलो आहोत. पुढेही कोणत्याही विकासकामात आम्ही कमी पडणार नाही. पै. किरण साकोरे सारख्या ऊर्जावान युवकाच्या माध्यमातून आपल्या गटातील सर्व गावांच्या विकासकामांना गती मिळेल, ही जबाबदारी माझी आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपल्या कुटुंबातील प्रत्येक माणसाची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे. सुख-दुःखात किरण साकोरे नेहमी तुमच्यासोबत असतील. मायबाप जनतेने किरणला साथ दिली, तर या प्रदेशाचा विकास नव्या उंचीवर पोहोचेल. किरण, तू काळजी करू नकोस – तुझ्या माध्यमातून प्रभू श्रीराम आणि काशी विश्वनाथाचा आशीर्वाद मायबाप जनता घेईल. शक्य झाल्यास मी स्वतः पुणे ते दौंड रेल्वे प्रवासात यात्रेकरूंसोबत राहण्याचा प्रयत्न करीन,” असे भावनिक शब्दांत ते म्हणाले.
या संवाद मेळाव्यात भाविकांसाठी स्नेहभोजनाची तसेच गावागावांतून यात्रेकरूंना ने-आण करण्यासाठी बससेवेची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाला भाविक व जनतेचा उत्स्फूर्त, प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर (माऊली) वाळके, माजी सभापती संजीवनी कापरे, फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर, भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व तुळापुरचे माजी सरपंच अमोल शिवले, भाजप युवा नेते व लोणीकंद ग्रामपंचायतीचे सदस्य गौरव झुरुंगे, तसेच लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटाचे विजयी दावेदार पै. किरण साकोरे उपस्थित होते.
दरम्यान, माऊली वाळके म्हणाले, “आपल्या परिसराच्या विकासासाठी प्रदीपदादा कंद यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सर्वांच्या अडीअडचणीत धावून जाणारे प्रदीपदादा हेच खरे लोकनेते आहेत. त्यामुळे प्रदीपदादांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी पै. किरण साकोरे यांना भक्कम साथ द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे निवेदन अतुल बनकर यांनी केले, तर आभार फुलगावचे माजी उपसरपंच व युवा नेते राहुल वागस्कर यांनी मानले.
Editer sunil thorat





