दिल्ली : भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित आर्मी डे परेडसाठी यंदाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पहिल्यांदाच दिल्लीबाहेर ही परेड आयोजित होत असून, पुणे शहराला हा सन्मान मिळाला आहे. भारतीय सैन्याच्या या निर्णयाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आर्मी डे परेडचा इतिहास आणि उद्देश..
आर्मी डे दरवर्षी १५ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी लेफ्टनंट जनरल के. एम. करियप्पा यांनी १९४९ साली पहिल्या भारतीय सेना प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याआधी हे पद ब्रिटीश जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडे होते. आर्मी डे चा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान करणे आणि त्यांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करणे. यामध्ये परेड, आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि सैन्याच्या विविध टुकड्यांचा उत्साहपूर्ण मार्च असतो.
पुण्यात परेड का आयोजित केली?
दिल्लीतील करियप्पा ग्राउंडवर होणारी आर्मी डे परेड आता विविध शहरांमध्ये हलवण्याचा निर्णय भारतीय सैन्याने घेतला आहे. २०२३ साली बंगळुरूमध्ये आणि २०२४ मध्ये लखनौमध्ये परेड आयोजित करण्यात आली होती. यंदा पुणे हे तिसरे शहर ठरले आहे.
पुणे हे भारताच्या लष्करी इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि साउदर्न कमांडचे मुख्यालय आहे. याशिवाय, मराठा साम्राज्याशी असलेली ऐतिहासिक नाळ आणि सैनिकी प्रशिक्षणासाठीचे केंद्र म्हणून पुण्याचा विशेष सन्मान आहे. पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) आणि सेंटर येथे ही परेड होणार आहे. सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग देखील या परेडला उपस्थित राहणार आहेत
२०२५ ची आर्मी डे परेड: काय विशेष?
या वर्षीच्या परेडची थीम ‘समर्थ भारत, सक्षम सेना’ अशी आहे. यात भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरण, समावेशकता आणि जनसामान्यांशी जोडलेपण यावर भर दिला जाणार आहे. परेडमध्ये स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन होईल. यामध्ये अर्जुन एमके-१ए टँक, के-९ वज्र हॉवित्झर तोफा, तसेच मेक इन इंडिया अंतर्गत विकसित ड्रोन यांचा समावेश असेल.
पुण्यातील दक्षीण कमांड परेड ग्राउंडवर पॅरा जम्पिंगचे लाईव्ह डेमो, कॉम्बॅट ड्रिल्स आणि लष्करी बँडचे सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरीकांना सैन्याच्या विविध उपक्रमांची माहिती मिळेल.
आंतरराष्ट्रीय सहकार्याचा स्पर्श…
या वर्षीच्या परेडमध्ये नेपाळ सैन्याचा ३३ सदस्यांचा बँड देखील सहभागी होणार आहे. हे भारत-नेपाळमधील मैत्रीचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. यावर्षी परेडमध्ये पहिल्यांदाच ‘रोबोटिक म्युल्स’ सहभागी होणार आहेत. हे यंत्रमानव प्राण्यांसारखे दिसणारे यंत्र दुर्गम भागात मालवाहतूक करण्यासाठी वापरले जातात.
महिला अग्निवीरांची विशेष कामगिरी
२०२५ च्या परेडमध्ये महिला अग्निवीरांचे विशेष योगदान दिसून येईल. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सर्व महिला संचलन तुकडी यंदा परेडमध्ये सहभागी होणार आहे.
बंगळुरूमधील लष्करी पोलीस दलाच्या (सीएमपी) महिला अग्निवीरांचा संचही या परेडचा भाग असेल. कॅप्टन संध्या महला या ५८ सदस्यीय संचलनाचे नेतृत्व करणार आहेत.
मराठा साम्राज्याचा कनेक्शन..
पुण्याचा मराठा साम्राज्याशी घनिष्ठ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या साम्राज्याच्या थसैनिकी तंत्रज्ञानाचा आणि धोरणांचा प्रभाव भारतीय सैन्यावर आजही आहे.
मराठा साम्राज्याच्या युद्धनीती, किल्ले बांधणी आणि सैनिकी प्रशिक्षणाच्या परंपरेला भारतीय सैन्य सन्मान देत आहे. त्यामुळे पुण्यात परेड आयोजित करणे ही एक ऐतिहासिक कृतज्ञता आहे.
सैनिकी परंपरेचा सन्मान
आर्मी डे परेड फक्त लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन नाही, तर ती सैन्याने जनतेशी कसे जोडले आहे, याचा सन्मान आहे. पुण्यातील परेडमुळे देशातील तरुणांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल.
२०२५ ची परेड भारताच्या सैन्याचा शौर्य आणि प्रगतीचा उत्सव ठरणार आहे. ही परेड राष्ट्रीय एकात्मता, सामर्थ्य आणि आधुनिकतेचे प्रतीक म्हणून पाहिली जाईल.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा