हडपसरचे माजी आमदार करणार जय महाराष्ट्र ? विधानसभेला डावल्याने निर्णय.; माजी आमदार महादेव बाबर..

पुणे (हडपसर) : महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता अनेक पक्षांकडून “एकला चलो रे” स्वबळावर निवडणुका लढवण्याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही जाहीर भाषणात महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते. तर दुसरीकडे स्वबळाच्या घोषणेने ठाकरे गटात भूकंपावर भूकंप होताना दिसत आहेत.
पुण्यात हडपसर येथे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सुत्राकडुन असे समजते की पुण्याचे कट्टर शिवसैनिक माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात महादेव बाबर हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. काल महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने जवळपास अर्धा तास चर्चा झाली. असल्याचे समजते. या बैठकीला मंत्री उदय सामंत देखील हजर होते.
विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज महादेव बाबर.
महादेव बाबर यांच्यासोबत पुण्यातील काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. महादेव बाबर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण महाविकास आघाडीतडून अंतिम क्षणी प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्याने बाबर यांना माघार घ्यावी लागली होती. तिकीट नाकारल्याने नाराज महादेव बाबर यांनी विधानसभेला अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना उघड पाठिंबा दिला होता. अखेर यामुळेच नाराज झालेल्या महादेव बाबर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असावा.



