
पुणे (हडपसर) : (१५ नंबर चौक) ते मांजरी बुद्रुक रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू असून आणखीन पुर्ण झाले नाही. या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साधे विजेचे खांबही नसल्याने वाहन चालकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास रेल्वे ब्रिज जवळ अक्षरशा वाहन चालकांना कसरत करावी लागते.
दोन आमदार पण काम पूर्ण नाही…
हडपसर मतदारसंघात दोन आमदार आहेत. विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चेतन तुपे तर विधान परिषदेत भाजपचे आमदार योगेश टिळेकर आहेत. विषेश म्हणजे हे दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असूनही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने महादेव नगर, ढेरे बंगला, गोपाळ पट्टी, अतुल टकले नगर ते मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिक आमदारांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. हडपसर मांजरी रस्त्याचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. हडपसर ते मांजरी रेल्वे स्टेशन उड्डाणपुलापर्यंत राज्य सरकारच्या बांधकाम विभागाकडून केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात मांजरी रेल्वे स्टेशन ते मांजरी स्मशानभूमी नदीच्या पुलापर्यंतचे काम पीएमआरडीएकडून केले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मांजरी गावाचा समावेश पुणे महापालिकेत झाला असल्याने या रस्त्याच्या कामासाठी पुणे महापालिकेने निधी उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, असे स्थानिक पुढार्याचे म्हणणे आहे.
तीन तिघांडा काम बिघाडा….
पीएमआरडीए, बांधकाम विभाग आणि आता महापालिका या तीन यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे सदर रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. महापालिकेच्या हद्दीत मांजरी गावाचा समावेश झाल्यानंतर रस्त्यांसह पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र अर्धवट कामे कोणी पूर्ण करावी, यासाठी एकही यंत्रणा जबाबदारी घ्यायला तयार नाही. यात केवळ गावकरी भरडले जात आहोत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
भूसंपादनाचा मोबदला न देताच रस्त्याचे काम, ठेकेदार मस्त…
या रस्त्याचे जे काम झाले, ते निकृष्ट दर्जाचे आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाच्या माध्यमातून केवळ ठेकेदाराचे भले केले आहे. यात राजकारण्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कोणतेही विकास काम करताना त्यात नागरिकांचे नुकसान होणार असेल तर त्यांना योग्य मोबदला दिला जातो. त्यानंतर भूसंपादन केले जाते. मात्र या बाबतीत उलटा कारभार करण्यात आला आहे. भूसंपादन न करताच ठेकेदाराने काम सुरू केले. त्यामुळे अनेकांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे, असे अनेक नागरिकांनी बोलताना सांगितले.
कामाचा दर्जा निकृष्ट…
कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. या कामाकडे पीएमआरडीए प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कामाचा कालावधी संपल्यावर अनेकदा मुदत वाढवण्यात आली. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने कामाची गुणवत्ता ढासळली आहे. पदपथ, ड्रेनेज, चेंबर, दुभाजक ठिकठिकाणी तुटले आहेत. कोणतेही काम सलग होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते…
रस्त्यावरच दुतर्फा वाहनांची पार्किंग….
हडपसर-मांजरी रस्ता दोन्ही बाजूला प्रत्येकी २० फूट रुंद केला जात आहे. घुले वस्ती ते गोपाळ पट्टीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल, असे वाटत असतानाच रस्त्यावर नागरिकांकडून चार चाकी गाड्या, पाण्याचे टॅकर, स्कूल बस तसेच बंद पडलेली वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहनचालकांना २० फुटाच्या रस्त्यातून केवळ १० फुटी रस्त्यातून खबरदारीने डोळ्यात तेल घालून मार्ग काढावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय, रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची नित्याचीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून यामुळे अनेक वेळा रस्त्यावर वाहन चालकांना मारहाणीचे प्रकार घडत असतात.
राजेन्द्र साळवे, अध्यक्ष अखिल मांजराई नगर, नागरीक कृती समिती…
हडपसर-मांजरी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, हे समजत नाही. जबाबदारीची टोलवाटोलवी केली जात आहे. भूसंपादन न करता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. अनेकांना मोबदला देखील मिळाला नाही. राजकारणी, अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे की काय असा संशय बळावत असल्याचे खाजगीत नागरिक बोलत आहेत. तीन ही प्रशासनाने वेळीच रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा मोठे जन आंदोलन केले जाईल.
कोणाला काम अपुर्ण हवे ?….
पीएमआरडीए प्रशासनाने ठेकेदाराला पाठीशी घालणे बंद केले तरच रेल्वे उड्डाणपूल ते मुळा-मुठा नदीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण होईल. रेल्वे उड्डाणपूल ते स्मशानभूमी या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण काही प्रमाणात झाले आहे, तर काही ठिकाणी खड्याचे साम्राज्य आहे. ठेकेदाराने बहुतेक ठिकाणी अर्धवट काम केले असल्याचे प्राथमिक दिसून येत आहे. मध्येच ब्लॉक असल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी आणि कामगारांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी चेंबर खचले आहेत. विद्युत खांब, डीपी अद्याप रस्त्यातच आहेत. पदपथ सलग नाहीत. दुभाजक तुटून रस्त्यावर पडले आहेत. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा मतदारसंघ….काय म्हणाले..
मांजरी गावाचा समावेश महापालिकेत झाल्यापासून या भागात विकास करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. रस्त्याचे काम रखडले आहे, तर त्यासाठी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे.
योगेश टिळेकर, आमदार, विधान परिषद, भाजप काय म्हणाले…..
हडपसर-मांजरी रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मांजरी गावातील कॉर्नरजवळ भूसंपादन करणे बाकी आहे. रस्त्यावर विद्युत खांब बसवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. दुभाजकामध्ये गार्डन करण्याआधी या कामासाठी निधी मागितला आहे. लवकरच हे काम मार्गी लागून रस्ता पूर्णपणे तयार होईल.



