राजकीय वजन वापरा, मंत्रालयात ‘ओळख’ वापरून बदली रद्द करत पुन्हा जिल्हात बस्तान ; आता मनोरुग्णांवर बालरोगतज्ज्ञांकडून उपचार होणार… अजब गजब सरकार

पुणे : सरकारी कर्मचारी, अधिकारी यांची दर तीन ते चार वर्षांनी बदली होणे अपेक्षित असते. तोच नियम आरोग्य विभागातील डॉक्टरांनाही लागू आहे. परंतु जिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर व अधिकारी गेली १२ ते १५ वर्षे एकाच जागी ठाण मांडून बसले आहेत.
पुणे सुटता सुटाना…
त्यांची बदली दुसरीकडे केली, तरी ते थेट मंत्रालयात ‘ओळख’ वापरून आठवड्यातच बदली रद्द करतात. कोणी मनोरुग्णालयात बदली करून घेत, तर कोणी प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालयात येत. त्यामुळे इतर पात्र डॉक्टरांनी केवळ ग्रामीण भागातच सेवा बजावायची का, असा प्रश्न या डॉक्टरांकडून आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेषज्ञ या संवर्गांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या बदल्या सचिवांच्या आदेशाने होतात. त्यात जिल्हा रुग्णालयात गेल्या १५ वर्षांपासून असलेल्या अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांची साताऱ्यातील सामान्य रुग्णालयात बदली झाली होती. परंतु, त्यांनी आठवडाभरातच मंत्रालयात ‘ओळख’ वापरून ती बदली रद्द करत पुन्हा जिल्हा रुग्णालयात आले. तसेच, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर झाली होती. मात्र त्यांनी जिल्हा रुग्णालयातीलच सरकारी निवास अद्याप सोडलेले नाही. तसेच त्या जिल्हा रुग्णालयात आठवड्यातील दोन दिवस असतात, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली.
मनोरुग्णांवर बालरोगतज्ज्ञांकडून उपचार…
जिल्हा रुग्णालयातील महिला बालरोगतज्ज्ञांची बदली नंदुरबारला झाली होती. त्यांनी ती रद्द करून पुन्हा येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाची जागा पटकावली, तर अतिदक्षता विभागतज्ज्ञांची बदली सातारा येथे झाली होती. त्यांनीही येरवडा मनोरुग्णालयात बदली करून घेतली. आता ते प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालयात तीन दिवस असतात. इतर डॉक्टरांचीही बदली दुसरीकडे झाली. परंतु त्यांची ‘वर’पर्यंत पोहोच नसल्याने त्यांनी बदल्या निमूटपणे स्वीकारल्या. हा प्रकार म्हणजे आरोग्य खात्याचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी केला.
निपुन विनायक, सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग पुढे म्हणाले..
या बाबतच्या प्रकरणांची अधिक चौकशी करण्यात येणार आहे. तसेच याबाबत पुण्यातील एका डॉक्टरची बदली ही गडचिरोली येथे करण्याची शिफरास केली आहे.



