राष्ट्रपतींना महिलांना स्वसंरक्षणासाठी खून करण्याची परवानगी द्यावी ; महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे..
घोषणाबाजी करणाऱ्या महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं. मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरु असताना महिला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. शक्ती कायदा अंमलबजावणीसाठी आंदोलकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. दरम्यान, घोषणाबाजी करणाऱ्या महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना मलबार हिल पोलीस स्थानकात नेण्यात आलं आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्त रोहिणी खडसे यांनी सकाळीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून थेट राष्ट्रपतींना महिलांना स्वसंरक्षणासाठी खून करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. खडसे यांनी महिलांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सह्याद्री गेस्ट हाऊस गाठले. सह्याद्री गेस्ट हाऊस येथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट नाकारली, त्यामुळे रोहिणी खडसे संतप्त झाल्या. त्यांनी आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर रोहिणी खडसे यांनी आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. “मी महिलांच्या मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती, पण ती नाकारण्यात आली. पोलिसांनी मला अडवले, हा लोकशाहीचा अपमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.



