
पुणे : सेवाज्येष्ठतेनुसार व उपलब्ध जागांनुसार बदल्या करण्यात येणार असून यात पारदर्शकता असेल. माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. तसेच कुणीही राजकीय पदाधिकार्यांना भेटू नये किंवा त्यांचे शिफारसपत्र आणू नका, अशा कडक तंबी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकारी व कर्मचार्यांना दिल्या आहे.
जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आणि अधिकार्यांसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महसूल कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भूमी अभिलेख विभागाच्या राज्य संचालिका सरिता नरके, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, डॉ. कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, कर्मचार्यांनी कामात पारदर्शकता वाढवावी, सर्वांनी नागरिकांच्या भेटण्याची वेळ निश्चित करावी. त्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी दीड या काळात कार्यालयातच राहून नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष पुरवावे.
या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणत्याही कर्मचार्याला बैठकीसाठी बोलावले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तालुकास्तरावरील समस्या तालुकास्तरावरच सुटाव्यात, यासाठी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करावे, अशा सूचना डुडी यांनी दिल्या.
२५० तलाठी लवकरच रुजू होणार..
जिल्ह्यात नव्याने अडीचशे तलाठी रुजू झाले असून, पुढील काही दिवसांत १०० तलाठी रुजू होणार आहेत. अनेकांना कार्यालय नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या कार्यालयांसाठी भाड्याने जागा घेण्याचा प्रस्ताव येत्या दहा दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावा. कर्मचार्यांकडून चांगल्या पद्धतीचे काम अपेक्षित असताना त्यांना संगणक प्रिंटर या सुविधांसह कार्यालयही उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ च्या आराखड्यात कार्यालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
येत्या पंधरा दिवसांत अवैध क्रशर थांबवा; अन्यथा…
जिल्ह्यातील अवैध क्रशर उद्योग आणि खाणकामामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. हे तातडीने थांबवावे. हे अवैध क्रशर उद्योग येत्या पंधरा दिवसांत तसेच अवैध खाणकाम दोन महिन्यांत बंद करावेत. त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल यंत्रणेला दिले; अन्यथा मला कारवाई करावी लागेल. गेल्या काही महिन्यांत अवैध उत्खननावरून जिल्ह्याच्या विविध भागांत कारवाई करण्यात आली आहे.
‘महसूल’ कार्यशाळेत अधिकारी, कर्मचार्यांना जिल्हाधिकार्यांचा इशारा..
जिल्ह्यात राबविण्यात येणार्या अनेक योजनांत प्रलंबितता दिसून येत आहे. त्यासाठी नेहमीची कारणे देऊन चालणार नाही. पारदर्शकपणे काम केल्यास ही कामे जलद गतीने मार्गी लागतील. त्यासाठी कोणाचाही दबाव स्वीकारू नका. ब्लॅकमेल करणार्यांना बळी पडू नका. तुम्हा पारदर्शक असल्यास काळजी करू नका, मात्र, प्रलंबितता ठेवून चालणार नाही, अशा शब्दांत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल अधिकारी-कर्मचार्यांना तंबी दिली.
जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आणि अधिकार्यांसाठी आयोजित महसूल कार्यशाळेत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, यापुढील काळात सर्वच विभागाचा जिल्हास्तरावरून आढावा घेण्यात येईल. त्यात 200 ते 250 गुणांची साचा ठरवून जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार ठरविण्यात येईल. त्यांना पुरस्कृत केले जाईल. मात्र, जे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई अटळ आहे.



