
पुणे (हवेली) : विवाहासाठी पाहुणे बघून गेल्याने एक अल्पवयीन मुलगी घरातून पळून गेल्याची घटना घडली होती. लोणी काळभोर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या २४ तासाच्या आत मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्याकडे सुखरूप सुपूर्त केले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगी अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ही १६ वर्षाची विद्यार्थिनी लोणी काळभोर येथील तिच्या चुलत्याकडे राहण्यासाठी आली होती. मुलीचे चुलते हे लोणी काळभोर परिसरातील एका शाळेच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. चांगले स्थळ पाहून तिचे लग्न जमवून ठेवायचे त्यानंतर शिक्षण व १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिचा विवाह करायचा. असे तिच्या आईवडिलांनी ठरविले होते. रविवार (९ मार्च) रोजी त्या मुलीला पाहुणे बघून गेले होते. आपला विवाह होणार या भीतीने मुलगी त्याचदिवशी रात्री घर सोडून निघून गेली होती.
ती घरातुन गेले नंतर परिसरात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अल्पवयाचा गैर फायदा घेवुन फुस लावून पळवून नेले आहे. अशी फिर्याद मुलीच्या आईवडिलांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते.
तपास करीत असताना, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यामार्फत माहिती मिळवली असता. मुलगी ही कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात आहे. अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलीला मंगळवार (११ मार्च) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. आणि मुलीला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलिस हवालदार दीपिका थोरात, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, उषा थोरात यांच्या पथकाने केली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपुर्वक तपास करून मुलीला अवघ्या २४ तासाच्या आत सुखरूप पालकांकडे सुपूर्त केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



